उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोरचा माईक खेचला, पुढे काय काय खेचतील माहिती नाही…

0
173

मुंबई, दि. ५ (पीसीबी) : काल रिक्षावाल्याची रिक्षा सुस्साट सुटली होती, ब्रेकच लागत नव्हता, असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला. तसेच काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोरचा माईक खेचला, पुढे काय काय खेचतील माहिती नाही, असा तिरकस बाणही त्यांनी फडणवीसांवर सोडला.

१० दिवसांच्या राजकीय घडामोडींनंतर सत्तेवर आलेल्या एकनाथ शिंदे आणि भाजप सरकारने काल विधानसभेत १६४ आमदारांच्या भक्कम पाठिंब्यावर विश्वासदर्शक ठराव जिंकला. अभिनंदनपर प्रस्तावाला उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार भाषण केलं. तब्बल पावणे दोन तासांच्या भाषणात त्यांनी सत्तांतराचं नाट्य कसं घडलं, हे सांगितलं. याच पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव यांनी शिंदे-फडणवीसांना टोमणे लगावले.

शिवसेना महिला संघटक आणि संपर्कप्रमुख, संघटक यांची शिवसेनाभवनात बैठक संपन्न झाली. अनेक महिला पदाधिकाऱ्यांनी आपल्या भावना याप्रसंगी व्यक्त केल्या. शिवसेनेच्या रणरागिणी शेवटच्या श्वासापर्यंत शिवसेनेसोबत आणि उद्धव ठाकरे यांच्या सोबत कार्यरत राहतील अशी ग्वाही त्यांनी दिली. त्यांच्या भावना ऐकून घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना संबोधित केलं. कोण आलं, कोण गेलं याचा मला फरक पडत नाही. ज्यांना लढायचं असेल, त्यांनी माझ्यासोबत राहावं, पुन्हा नव्याने जोमाने शिवसेनेला उभा करु, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, “काल विधानसभेत काय काय घडलं, हे आपण पाहिलं. काल रिक्षावाल्याची रिक्षा सुस्साट सुटली होती, रिक्षाला ब्रेकच लागत नव्हता. अधिवेशन संपल्यानंतर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांसमोरचा माईक खेचला. पुढच्या काळात काय काय खेचतील, कळणार पण नाही”