पिंपरी- पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीतील शिवसेना पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ शिवसेनेचे मुख्य नेते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज (शुक्रवारी) जाहीर सभा होणार आहे. किवळेतील मुकाई चौक येथील मुक्ता मैदान येथे दुपारी तीन वाजता ही जाहीर सभा होणार आहे. याबाबतची माहिती शिवसेना उपनेते, खासदार श्रीरंग बारणे यांनी दिली.
खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक शिवसेना पूर्ण ताकदीने लढत आहे. ६० ठिकाणी पक्षाचे उमेदवार आहेत. जोरदार प्रचार सुरू आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना शहरातील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले प्रश्न मार्गी लावले. प्राधिकरण बाधित शेतकऱ्यांना साडेबारा टक्के परतावा मिळवून दिला. हा प्रश्न कोणीच सोडविण्याचे धाडस केले नाही. एकनाथ शिंदे यांनी हा प्रश्न सोडविला. अनधिकृत बांधकामावरील शास्तीकर माफीचा निर्णय घेतला. ५०० कोटी रुपये दंड नागरिकांचा माफ केला. हा धाडसी निर्णय एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना घेतला. शहरासाठी वाढीव पाणी आणण्याकरिता उपमुख्यमंत्री, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. लवकरच मुळशी धरणातील पाणी कोटा मंजूर होईल. त्यामुळे शहरातील नागरिकांनी शिवसेना उमेदवारांना साथ द्यावी.
किवळे येथे होणाऱ्या जाहीर सभेला पक्षाचे सर्व उमेदवार उपस्थित राहणार आहेत. संघटनेचे पदाधिकारी, शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने जाहीर सभेला उपस्थित रहावे, असे आवाहन खासदार श्रीरंग बारणे यांनी केले.









































