उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुणेकरांसाठी मोठ्या घोषणा

0
2

दि. २२ (पीसीबी) : गणेशोत्सवाची लगबग सुरू झाली असून अवघ्या काही दिवसांवर हा उत्सव येऊन ठेपला आहे. मुंबई-पुण्यासह महाराष्ट्रात सर्वत्र गणपती बाप्पा मोरया च्या जयघोषाने वातावरण रंगत आहे. अशा पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पुणेकरांसाठी मोठ्या घोषणा केल्या आहेत. त्यांनी या घोषणा पुण्यातील पत्रकार परिषदेत माध्यमांशी संवाद साधताना केल्या.

अजित पवार यांनी यंदाचा गणेशोत्सव राज्य महोत्सव म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं. राज्यातील सर्व यंत्रणा उत्सव निर्विघ्न आणि आनंदात पार पडावा यासाठी कामाला लागतील, असं त्यांनी स्पष्ट केलं.

पुणे मेट्रो रात्री २ पर्यंत सुरू :

गणेशोत्सव काळात पुणेकरांसाठी मेट्रो सेवेत मोठा बदल होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केलं की सकाळी ६ वाजल्यापासून रात्री २ वाजेपर्यंत मेट्रो सुरू राहील. विसर्जनाच्या दिवशी मात्र मेट्रो अख्खा दिवस सुरू ठेवली जाईल. तसेच मानाचे गणपती पाहण्यासाठी कोणत्या स्टेशनवरून चढावे आणि कुठे उतरावे याबाबत विशेष नियोजन केलं जाणार आहे.

याशिवाय, वाढलेल्या गर्दीला तोंड देण्यासाठी मेट्रोच्या फेऱ्याही वाढवण्यात येतील. यामुळे गणेश भक्तांना मोठी सुविधा मिळणार आहे.

विसर्जन मिरवणुकीबाबत निर्णय :

गणेशोत्सव काळात विसर्जन मिरवणुकीसाठी काही मंडळांनी सकाळी ७ वाजता मिरवणूक काढण्याची मागणी केली आहे. याबाबत अजित पवार यांनी सांगितलं की, मानाच्या गणपतींचा मान राखून आणि मंडळांच्या मागण्यांचा विचार करून सकारात्मक निर्णय घेण्यात येईल. ढोल-ताशा पथकांची संख्या, वेळापत्रक यावर देखील चर्चा सुरू असून लवकरच तोडगा निघेल.


अजित पवार यांनी पुणे ग्रँड चॅलेंज टूरची माहिती दिली. यामध्ये दोन्ही महापालिका, जिल्हा परिषद आणि विविध यंत्रणा सहभागी होणार आहेत. तसेच पुरंदर विमानतळ प्रकल्पाबाबतही त्यांनी भूमिका स्पष्ट केली. राज्य सरकार हा विमानतळ करण्यास कटिबद्ध असून १२८५ एकर जमिनीचं भूसंपादन सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. काही गावांमध्ये विरोध असला तरी चर्चेच्या माध्यमातून प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल, असं त्यांनी नमूद केलं.