उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते कामगार भवनाची पायाभरणी

0
117

पुणे, दि. 27 (पीसीबी) : उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शिवाजीनगर येथे उभारण्यात येणाऱ्या कामगार भवनाची पायाभरणी करण्यात आली.

यावेळी खासदार डॉ. मेधा कुलकर्णी, कामगार आयुक्त डॉ. एच. पी. तुम्मोड, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण, अपर कामगार आयुक्त शैलेंद्र पोळ, अधीक्षक अभियंता बप्पा बहीर, कामगार उप आयुक्त अभय गिते आदी उपस्थित होते.

कामगार भवन बाबत माहिती

सद्यस्थितीत उद्योग, उर्जा व कामगार विभाग, मंत्रालय, मुंबई यांच्या अधिनस्त पुणे विभागातील अपर कामगार आयुक्त यांचे कार्यालय, पुणे विभाग, पुणे, कामगार उप आयुक्त यांचे कार्यालय, पुणे जिल्हा, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचलनालय, पुणे, बाष्पके संचलनालय, पुणे, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, पुणे, घरेलू कामगार मंडळ, पुणे व सुरक्षा रक्षक मंडळ, पुणे ही कार्यालये पुणे शहरात विविध ठिकाणी कार्यरत आहेत.

ही महामंडळ, विविध विभागस्तरीय आणि जिल्हास्तरीय कार्यालये पुणे शहरातील मध्यवर्ती ठिकाणी एकाच प्रशस्त व दर्जेदार प्रशासकीय इमारतीमध्ये कार्यरत व्हावीत यासाठी पुणे शहरामध्ये मध्यवर्ती ठिकाण असलेल्या बंगला क्र. 5, मुंबई-पुणे रस्ता, शिवाजीनगर येथे हे कामगार भवन उभारण्यास मान्यता मिळाली आहे. याचा लाभ कामगार, त्यांचे प्रतिनिधी, मालक प्रतिनिधी, विविध संघटना, विधीज्ञ तसेच कामगार विभागांतर्गत विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी येणारा सर्वसामान्य कामगार, महिला व नागरिक यांना मिळणार असल्याची माहिती अपर कामगार आयुक्त शैलेंद्र पोळ यांनी या अनुषंगाने दिली