उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नियोजन विभागाचा महत्वपूर्ण निर्णय ;सारथी’ व ‘महाज्योती’च्या विद्यार्थ्यांना नोंदणी दिनांकापासून अधिछात्रवृत्ती

0
82

मुंबई, दि. 24 (पीसीबी) : ‘सारथी’संस्थेच्या दिनांक 1 एप्रिल 2022 ते 31 डिसेंबर 2022 पर्यंत कायम नोंदणी असलेल्या 724 विद्यार्थ्यांना आणि ‘महाज्योती’च्या पात्र विद्यार्थ्यांना नोंदणी दिनांकापासून शंभर टक्के अधिछात्रवृत्तीचा लाभ अदा करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज घेण्यात आला. उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजनमंत्री अजित पवार यांच्या नियोजन विभागाने ‘बार्टी’च्या धर्तीवर ‘सारथी’ व ‘महाज्योती’च्या विद्यार्थ्यांना नोंदणी दिनांकापासून शंभर टक्के अधिछात्रवृत्ती मिळण्यासंबंधीचा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडला होता. प्रस्तावाला मंत्रिमंडळाने मंजूरी दिली असून इतिवृत्त मान्यतेची वाट न पाहता यासंबंधीचा शासननिर्णय तात्काळ निर्गमित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ‘बार्टी’प्रमाणे ‘सारथी’ व ‘महाज्योती’च्या विद्यार्थ्यांनांही आता नोंदणी दिनांकापासून शंभर टक्के अधिछात्रवृत्ती मिळणार असल्याने संबंधीत विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून या विद्यार्थ्यांनी उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांचे त्याबद्दल आभार मानले आहेत.

लोहगाव विमानतळाचे नाव बदलून जगद्गुरु संत तुकाराम महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ पुणे असे करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या निर्णयानुसार नामकरणाची शिफारस केंद्र शासनास पाठविण्यात येईल.

जिल्हा तसेच प्रादेशिक परिविक्षा व अनुरक्षण संघटनेमार्फत चालवली जाणारी निरीक्षण गृहे व बालगृहातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सुधारित आश्वासित प्रगती योजना व शिक्षकांना वरिष्ठ व निवड श्रेणी लागू करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

राज्याच्या सांस्कृतिक धोरण-२०२४ ला मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. जागतिक पातळीवर राज्याचे सांस्कृतिक महत्त्व अधोरेखित करणे या दृष्टीने हे सांस्कृतिक धोरण तयार करण्यात आले आहे.

पणन हंगाम 2023-24 करिता धानाच्या भरडाईसाठी भात गिरणीधारकांना केंद्र शासनाकडून देण्यात येणाऱ्या भरडाई दराव्यतिरिक्त राज्य शासनाकडून प्रति क्विंटल चाळीस रुपये अतिरिक्त भरडाई दर मंजूर करण्याचा निर्णय.

पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय व दिवाणी वरिष्ठस्तर न्यायालय स्थापन करून पदे मंजूर करण्यास मान्यता देण्यात आली.

शिरूर ते छत्रपती संभाजीनगर या नवीन ग्रीनफिल्ड द्रुतगती मार्गास मंजुरी. या 205 किलोमीटरच्या द्रुतगती मार्गास 14 हजार 886 कोटी रुपये खर्च येईल. या मार्गाचे काम बीओटी तत्वावर होणार असून काम पूर्ण झाल्यानंतर 2008च्या पथकर धोरणानुसार वाहनांवर पथकर लावण्यात येईल.

करदात्यांचे हित लक्षात घेऊन महाराष्ट्र वस्तू व सेवाकर (सुधारणा) अध्यादेश,2024 च्या प्रारुपास मान्यता. करदाते आणि वस्तू व सेवा कर विभाग यांच्या अडचणी कमी व्हाव्यात म्हणून हा निर्णय घेण्यात आला.

जळगाव जिल्ह्यातील श्यामाप्रसाद मुखर्जी सहकारी सूतगिरणी मर्या. शेंदुर्णी (ता. जामनेर) आणि यवतमाळ जिल्ह्यातील बाबासाहेब नाईक कापूस उत्पादक सहकारी सूतगिरणी मर्या., पिंपळगांव (कान्हा), ता.महागांव या दोन सूतगिरण्यांना सहाय्य करण्यास मान्यता.