उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत गुरुजन गौरव समारंभ संपन्न

0
118

विविध क्षेत्रातील गुरुजनांचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी- उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे, दि.२० जुलै (पिसीबी) – भारतीय संस्कृतीत गुरूचे स्थान अत्यंत महत्वाचे आहे. विविध क्षेत्रात समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या गुरुजनांचे जीवन आणि कार्य समाजासाठी प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. चिंतामणी ज्ञानपीठ आणि आप्पा रेणुसे मित्र परिवार यांच्यावतीने गणेश कला व क्रीडा मंच येथे आयोजित गुरुजन गौरव समारंभ प्रसंगी उपमुख्यमंत्री श्री. पवार बोलत होते. यावेळी केंद्रीय नागरी विमान वाहतूक आणि सहकार राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ, आमदार भीमराव तापकिर, आयोजक विजय (अप्पा) रेणुसे, युवराज रेणुसे, दिपक मानकर, शरद ढमाले, रुपाली ठोंबरे, रमेश कोंढे आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, गुरू हा शिष्याच्या आयुष्यातील अंधकार दूर करून त्यांच्या आयुष्यात प्रकाश आणण्याचे काम करत असतो. गुरू हा शिष्याचे शरीर, मन व बुद्धी विकसित करण्याचे काम करतो. संघर्ष करायला, कठीण प्रसंगाला कसे सामोरे जायचे हेही शिकवतो. अशा गुरुजनांचा सन्मान ही त्यांच्याप्रती समाजाने व्यक्त केलेली कृतज्ञतेची भावना आहे. चिंतामणी ज्ञानपीठ आणि आप्पा रेणुसे मित्र परिवार समाजात मानवतेच्या कल्याणासाठी, समाजाच्या विकासासाठी योगदान देणाऱ्या गुरुजनांचा सत्कार करून राज्याची आणि देशाची गौरवशाली परंपरा पुढे नेण्याचे चांगले कार्य करीत आहे. नवीन पिढीसाठी हे कार्य कौतुकास्पद आहे.

सत्कार मूर्ती श्रीमती यास्मिन शेख यानी मराठी भाषा आणि व्याकरण शिकवण्याचे चांगले काम केले आहे. मराठी व्याकरण सोप्या श्रेणीत आणण्याचे त्यांचे कार्य प्रशंसनीय आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी राज्य शासनाने केंद्राकडे प्रस्ताव पाठवला आहे. लवकरच आपल्याला मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.