बारामती, दि. ११ (पीसीबी) – बारामती तालुक्यात पवार कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीवर शाई फेक अशक्य आहे, पण तसा प्रकार घडला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या बारामती-मोरगाव रस्त्यावरील काऱ्हाटी पाटी येथे लागलेल्या बॅनरवर अज्ञातांनी शाई फेकल्याचे उघडकीस आले आहे. अनेकांचा यावर विश्वास बसणार नाही, पण ही घटना बारामती तालुक्यातच घडली आहे.
बारामती ते मोरगाव रस्त्यावरील काऱ्हाटी पाटी येथील सुनेत्रा पवार यांच्या बॅनरवर शनिवारी रात्री अज्ञातांनी शाईफेक केली असावी, असा पोलिसांचा कयास आहे. या प्रकाराची पोलिस तपासणी करत आहेत, असे अतिरिक्त पोलिस अधीक्षक संजय जाधव यांनी सांगितले. दरम्यान, या शाईफेक प्रकरणावर खासदार सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया आली आहे. त्यांनी या घटनेचा निषेध केला आहे.
सुनेत्रा पवार यांचा ‘भावी खासदार’ असा उल्लेख असलेला एक बॅनर काऱ्हाटी येथे लावण्यात आला होता. शनिवारी रात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने त्या बॅनरवर शाई फेकली आहे. ही गोष्ट रविवारी सकाळी ग्रामस्थांच्या निदर्शनास आली. ग्रामस्थांनी तातडीने पोलिसांया याबाबतची माहिती दिली. त्यानंतर घटनास्थळी आलेल्या पोलिसांनी गावातील ग्रामस्थांच्या साहाय्याने तो बॅनर उतरवून ठेवला आहे.
दरम्यान, सुनेत्रा पवार यांच्या बॅनवर शाई फेकण्याचा प्रकार का करण्यात आला असावा, याचा पोलिस कसून शोध घेत आहेत. सुनेत्रा पवार ह्या आगामी लोकसभा निवडणुकीत बारामतीतून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार असू शकतात. त्यामुळे कोणी राजकीय द्वेषापोटी हा प्रकार केला आहे का, याचीही पोलिस चौकशी करीत आहेत.
खासदार सुप्रिया सुळे आज बारामती तालुक्याच्या दौऱ्यावर आहे. त्यांनही या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे. या शाईफेक प्रकरणाची संपूर्ण चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी खासदार सुळे यांनी केली आहे.