पिंपरी,दि.२६(पीसीबी) – महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री श्री अजित पवार यांनी वाकड येथील पर्यावरण पूरक श्री गणेश विसर्जन घाटास सदिच्छा भेट दिली. आणि या उपक्रमाबाबत सखोल माहिती जाणून घेतली.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष श्री विशाल वाकडकर यांनी वाकड येथे पर्यावरण पूरक श्री गणेश विसर्जन घाटाची निर्मिती केली असून, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते विसर्जन घाटाचे पूजन करण्यात आले. जलप्रदूषण रोखले जावे तसेच पर्यावरणाचा समतोल राखला जावा या मुख्य उद्देशाने या घाटाची निर्मिती केली आहे. मागील पाच वर्षांपासून हा सामाजिक उपक्रम युवा नेते विशाल वाकडकर यांच्यामार्फत राबविला जात आहे. गणेशोत्सवाच्या सहाव्या दिवसापर्यंत याठिकाणी जवळपास दोन हजार मूर्तींचे संकलन करण्यात आले आहे.
या ठिकाणी गणेश विसर्जन तसेच मुर्तिदान करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या ठिकाणी विसर्जित होणाऱ्या श्रींच्या मूर्तींचे श्री फाउंडेशन पुणे या संस्थेमार्फत संकलन करून दरवर्षी गणपती दान ही योजना राबविली जाते व यातून येणारा निधी हा अनाथ मुलांच्या शैक्षणिक खर्चासाठी वापरला जातो. या अनोख्या उपक्रमाबाबत माहिती जाणून अजित पवारांनी समाधान व्यक्त केले आणि विशाल वाकडकर यांचे कौतुक केले. आगामी काळात पर्यावरण संवर्धनाबाबत नागरिकांना आणखी प्रोत्साहित करण्यात येईल असे आश्वासन विशाल वाकडकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिले.
यावेळी पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि वाकड येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.











































