उपमुख्यमंत्री अजितदादांचे पिंपरी-चिंचवडकरांना मोठे गिफ्ट पवना बंद जलवाहिनी प्रकल्पाला मिळणार गती; शहरवासियांची पाणीटंचाईतून होणार कायमची मुक्तता

0
271

पिंपरी, दि. १३ (पीसीबी) :- पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांच्या हितासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुढाकार घेऊन हाती घेतलेला बंद पाईप लाईनचा प्रकल्प स्थगिती आदेशामुळे रखडला होता. मात्र सत्तेची सुत्रे हाती येताच शहरातील पाणीटंचाईचा विचार करून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या प्रकल्पावरील स्थगिती आदेश उठविण्यात मोलाची भूमिका बजाविली आणि शहरवासियांना मोठे गिफ्ट दिले आहे. पवना बंद जलवाहिनी प्रकल्पाचा विषय मार्गी लागल्याने शहरावरील पाणीटंचाईचे संकट दूर होणार आहे.

पिंपरी-चिंचवड शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन महापालिकेतील राष्ट्रवादीच्या तात्कालीन पदाधिकारी व नगरसेवकांनी पवना धरणातून बंद पाईप लाईनद्वारे शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी प्रकल्प हाती घेतला होता. त्यासाठी तात्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही पुढाकार घेत याला राज्य शासनाकडून मान्यता मिळवून दिली होती. मात्र, त्यावेळच्या विरोधकांनी शहरात एक आणि मावळ तालुक्यात एक भूमिका घेतल्याने या प्रकल्पावरून मोठे वादंग निर्माण झाले होते. मावळात घडलेल्या एका घटनेनंतर प्रकल्पाला स्थगिती देण्यात आली होती.

तब्बल 12 वर्षांपासून हा प्रकल्प स्थगिती आदेशामुळे रखडला होता. तर शहराची गेल्या 12 वर्षांत लोकसंख्या वाढल्याने शहरात पाणीटंचाईही निर्माण झाली होती. राज्यातील आणि महापालिकेतील सत्ता गेल्यानंतर हा प्रकल्प बासणातच गेल्याचे मानले जात होते. मात्र, अवघ्या काही दिवसांपूर्वीच सत्तेत सहभागी झालेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या प्रकल्पासाठी पुन्हा पुढाकार घेऊन नगरविकास विभागाकडे पाठपुरावा करण्यास सुरुवात केली होती.

हा प्रकल्प शहरवासियांसाठी महत्त्वाचा असल्याचेही राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे व इतर पदाधिकाऱ्यांनी अजितदादांकडे पवना बंद पाईप लाईनचा प्रकल्प सुरू करण्याबाबत आग्रह धरला होता. यावर अजितदादांनी राज्यपातळीवर वेगवान हालचाली करत या प्रकल्पावरील स्थगिती उठविण्याचा निर्णय शासनदरबारी घेतला. या निर्णयामुळे पुढील 25 वर्षे शहरावरील पाणीटंचाईचे संकट दूर होणार आहे. अजितदादांनी घेतलेल्या या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.

पिंपरी-चिंचवड शहरवासियांच्या हिताचा उपमुख्यमंत्री अजितदादा व राष्ट्रवादीने नेहमीच विचार केला आहे. शहराची पुढील 25 वर्षांची पाण्याची गरज या निर्णयामुळे पूर्ण होणार आहे. महापालिका पातळीवर या प्रकल्पाबाबत आम्ही पाठपुरावा करून हा प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. शहरहिताच्या दृष्टीने अजितदादांच्या माध्यमातून इतरही प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत.