मुंबई, दि. १० : मुंबईच्या प्रथम नागरिक असलेल्या महापौर रितू तावडे यांची संपत्ती ५ कोटी २६ लाख ६७ हजार ४१७ रुपये आहे. मात्र, उपमहापौर संजय घाडी हे तावडे यांच्यापेक्षा आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम असून त्यांची एकूण संपत्ती १२ कोटी ८४ लाख ९८ हजार ७४ रुपये इतकी आहे. विशेष म्हणजे गेल्या निवडणुकीत घाडी यांच्याकडे केवळ ३ कोटी १० लाख ३९ हजार ४३१ रुपये संपत्ती होती. म्हणजेच केवळ एका निवडणुकीत घाडी यांच्या संपत्तीत नऊ कोटी ७४ लाख रुपयांची वाढ झाली आहे.
मुंबई महानगरपालिकेतही धोरणात्मक निर्णय, प्रशासकीय दिशा आणि राजकीय भूमिका ठरवणाऱ्या महापौर व उपमहापौर या पदांवरील व्यक्तींची संपत्ती नागरिकांसाठी नेहमीच कुतूहलाचा विषय ठरतो. निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज सादर करताना जोडलेल्या प्रतिज्ञापत्रातून उमेदवारांची वैयक्तिक माहिती, गुन्हेगारी पार्श्वभूमी, कर्ज व देणी, तसेच स्थावर-जंगम मालमत्तेविषयी माहिती उपलब्ध होते. उपमहापौरपदी निवड झालेले शिवसेनेचे (शिंदे) संजय घाडी हे महाविद्यालयापासून राजकारणात सक्रिय आहेत. त्यावेळी ते शिवसेनेत होते.
विविध पक्षांतरांनंतर आता ते आता शिवसेनेत (शिंदे) कार्यरत आहेत. नुकत्याच पार पडलेल्या महापालिका निवडणुकीत ते प्रभाग क्रमांक ५ मधून नगरसेवक म्हणून निवडून आले. पक्षाने त्यांच्यावर विश्वास दाखवून नुकतीच त्यांची उपमहापौरपदी निवड केली. मुंबई महापालिकेच्या २०१७ मध्ये पार पडलेल्या निवडणुकीच्या रिंगणात घाडी उतरले होते. त्यावेळी घाडी यांनी प्रतिज्ञापत्र सादर केले होते. त्यात त्यांची संपत्ती ३ कोटी १० लाख ३९ हजार ४३१ रुपये इतकी दर्शविली होती. मात्र, मुंबई महानगरपालिकेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांची संपत्ती १२ कोटी ८४ लाख ९८ हजार ७४ रुपये इतकी आहे.
मागील निवडणुकीच्या तुलनेत यावेळी त्यांच्या मालमत्तेत सुमारे ९ कोटी रुपयांची वाढ झाल्याने सामान्य नागरिकांच्या भुवया उंचावल्या आहेत. घाडी यांच्याकडे टोयोटा इनोवा हायब्रीड (३२ लाख १ हजार ८०६ रुपये), अपे एक्ट्रा एचटी एलडीएक्स टेम्पो (२ लाख ७२ हजार रुपये), टोयोटा इनोवा (७ लाख ५५ हजार रुपये) आदी वाहने आहेत. तसेच, ते आणि त्यांच्या पत्नीकडे १ कोटी ४० लाख ५२ हजार ५८१ रुपये किंमतीचे दागिने आहेत. याव्यतिरिक्त त्यांच्याकडे शेतजमीन, व्यापारी गाळे, सदनिकाही आहेत.
दरम्यान, महापौर रितू तावडे यांनी त्यांच्या प्रतिज्ञापत्रात एकूण संपत्ती सुमारे पाच कोटी २६ लाख ७६ हजार ४१७ रुपये नमुद केली असून त्यांच्याकडे तीन वाहने आहेत. त्यात टोयोटा फॉर्च्युनर (४६ लाख ५० हजार रुपये), ह्युंदायी आय २० स्पोर्टस् (सहा लाख ४३ हजार १३६), आणि होंडा ॲक्टीवा (९० हजार १५० रुपये) या वाहनांचा समावेश आहे. महापौर व उपमहापौर यांच्या संपत्तीत तब्बल ७ कोटी ५८ लाख रुपयांचा फरक दिसून येतो.












































