दापोडी, दि. १३ (पीसीबी) – कंत्राटी पद्धतीने ग्रामसेवक म्हणून नियुक्त केल्याचा बनावट आदेश आणि इतर कागदपत्रे देत उपनिबंधक कार्यालयातील शिपायाने एका व्यक्तीची आणि शासनाची फसवणूक केली. हा प्रकार १ एप्रिल २०२१ ते १० जानेवारी २०२२ या कालावधीत उपनिबंधक सहकारी संस्था, दापोडी येथे घडला.
संतोष तुकाराम शिंगाडे (वय ४१, रा. पिंपळे गुरव) यांनी याप्रकरणी सोमवारी (दि. १२) भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शशांक बळवंत हाटे (वय ४१, रा. रास्ता पेठ, पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या शिपायाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शिंगाडे हे दापोडी येथील उपनिबंधक कार्यालयात मुख्य लिपिक पदावर काम करतात. त्यांच्या कार्यालयात शिपाई म्हणून काम करणा-या आरोपी हाटे याने नितीन रायकर यांना कंत्राटी पद्धतीने ग्रामसेवक पदावर नेमणूक झाल्याचे पत्र दिले. तसेच अन्य कागदपत्रेही दिली. ती घेऊन रायकर उपनिबंधक कार्यालयात आले असता हा याप्रकारे उघडकीस आला. त्यांनतर खातरजमा करून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.