उध्दव ठाकरे, शरद पवारांना तुफान सहानुभूती, भाजपचे टेन्शन वाढले

0
268

मुंबई, दि. ७ (पीसीबी) : शिवसेना फोडून सत्तेत आलेल्या भाजपाला महाराष्ट्रात उध्दव ठाकरे यांना मिळत असलेल्या ‘सहानुभूती’ चा सर्वाधिक त्रास होत आहे. आता अशाच प्रकारची ‘सहानुभूती’ ही राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोच्च नेता शरद पवार यांना मिळाली, तर काय असा महत्त्वाचा प्रश्न भाजप श्रेष्ठींची झोप उडवू शकतो. आगामी लोकसभा निवडणुकिला उध्दव ठाकरे यांची शिवसेना आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला मोठी सहानुभूती मिळत असल्याचे समोर आल्याने भाजपचे टेन्शन वाढले आहे.

बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेत बंड झाले. शिवसेना फुटली. बाळासाहेब ठाकरे हयात नसताना शिंदेचं बंड झाले, ते असते तर इतके मोठे बंड करण्याचे विद्यमान आमदारांचे सोडा भाजपनेदेखील त्याचा विचार स्वप्नात केला नसता.

पण, राष्ट्रवादी काँग्रेसची स्थिती मात्र भिन्न आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोच्च नेते शरद पवार यांनी लावलेले रोपट्याचे फळ आणि झाड हे थेट त्यांच्यासमोर नेले गेले. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना मिळालेल्या ‘सहानुभूती’पेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोच्च नेता शरद पवार यांना मिळणारी ‘सहानुभूती’ ही अधिक असेल.

त्यात शरद पवारांचे वयानुसार प्राप्त झालेले ज्येष्ठत्व ही ‘सहानुभूती’साठी जमेची बाजू असेल. मुळात शरद पवार यांच्या उत्तुंग राजकीय आयुष्यात अशा ‘सहानुभूती’ची त्यांना कधीच गरज भासली नाही, भासणार नाही. पण, या ‘सहानुभूती’ शब्दाने भाजप श्रेष्ठींची झोप मात्र निश्चित उडल्याशिवाय राहणार नाही. त्यात शरद पवार हे पॉलिटिकली खूप स्ट्राँग प्लेअर आहेत.

अशावेळी त्यांनी कोणाला या राजकीय आखाड्यात चितपट करण्याचे निश्चित केले, तर ते विरोधकांना मातीत लोळविण्याची क्षमता त्यांच्यात अजूनही आहे. त्यामुळे ‘सहानुभूती’ या शब्दाला यापुढे राजकारणात सर्वात मोठी लाट मानली जाऊ शकते. उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोच्च नेता शरद पवार या द्वयींना ‘सहानुभूती’ चा फायदा होऊ नये, यासाठी भाजपा नेते सावध असतील हे मात्र नक्की.

बिहारमध्ये भाजपने थेट ओबीसी नेते, जननायक कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न दिला. त्यानंतर जनता दल ( युनायटेड) च्या नितीश कुमार सरकारला राजीनामा द्यायला लावत तिथे भाजप समर्थित मुख्यमंत्री नितीश कुमार यांना केले. इंडिया आघाडीचे संस्थापक नितीश कुमार यांनाच थेट भाजपने गळाला लावत, इंडिया आघाडीची शक्ती कमजोर केली. शरद पवार भाजपसोबत जाणार नाहीत. हे निश्चित झाल्यावर त्यांना राजकीयदृष्ट्या शह देण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे.

मोदींनी संसदेत नुकतेच 400 पार चा नारा देताना विविध राज्यांतील राजकीय परिस्थिती, भाजपचा व इंटेलिजन्सचा अहवाल पाहूनच ही घोषणा दिली असेल. महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस फुटीची तालीम आधीच झाली असल्याने केवळ सरकारी यंत्रणांना हाताशी धरत येथील राजकीय व्यवस्था डिस्ट्रब केल्या गेली. महाराष्ट्रात शरद पवार यांनी थेट भाजपसोबत जाणार नाही, असे आधीच स्पष्ट केले असल्याने भाजपने येथे वेगळी व्यूहरचना राबविण्याचे निश्चित केले असेल.

पण, ‘सहानुभूती’ची लाटच भाजपकडे वळविण्यासाठी ‘जे नेते तुमचे तेच नेते आमचे’ या तत्त्वांवर महाराष्ट्रातदेखील कृषी क्षेत्रातील एक ‘भारतरत्न’ भविष्यात घडू शकतो. हे चित्र रेखाटण्यास भाजपचे पंडित कधीच मागे पुढे पाहणार नाही. त्यात मराठा नेतृत्वाचा ‘अनुशेष’ असलेली भाजप कधी ही महाराष्ट्रात मराठा नेतृत्वापुढे नतमस्तक होऊच शकते. शेवटी युद्धात, प्रेमात आणि राजकारणात कधीही कोणीही कोणाचा ‘व्हेंलटाइन’ होऊच शकते. त्यासाठी वेळ, काळ आणि घड्याळाची गरज नसते. गरज असते फक्त इच्छाशक्तीची.