उध्दव ठाकरे यांना चक्क भाजपची ऑफर, मैत्रीची दारे खुली

0
440

मुंबई,दि.१५(पीसीबी) – एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने वर्तमानपत्रात छापलेल्या पानभर जाहिरातींवरुन भाजपच्या काही नेत्यांमध्ये नाराजी असल्याचं दिसत आहे. त्यातच भाजपच्या नेत्याने थेट उद्धव ठाकरे यांनाच मैत्रीची खुली ऑफर दिल्यामुळे राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या आहेत. बरं ही मैत्रीची दारं किलकिली करणारे नेते कुणी साधे-सुधे नसून एका मोठ्या राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. कल्याणमध्ये शिवसेना आणि भाजपमध्ये वादाची पहिली ठिणगी पडल्याचं पाहायला मिळालं. मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी राजीनामा देण्याची तयारीही दर्शवली. त्यानंतर बहुतांश मराठी वृत्तपत्रांमध्ये छापून आलेल्या जाहिरातीत एकनाथ शिंदे यांची लोकप्रियता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा अधिक असल्याचा दावा करण्यात आला होता.

त्यातच भाजपच्या दिग्गज नेत्याने थेट उद्धव ठाकरे यांना युतीत सामावून घेण्याची तयारी दर्शवली आहे. उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांनी उद्धव ठाकरे यांना मैत्री ऑफर दिली आहे. मोदी@९ महाजनसंपर्क अभियानाच्या निमित्ताने महाराष्ट्र दौऱ्यावर असलेल्या मौर्य यांनी उद्धव ठाकरे यांच्याविषयी मोठं वक्तव्य केलं आहे. “उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र आहेत. त्यांच्या मनात काही विचार असतील त्यांनी आमचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्याशी चर्चा करावी. भाजपचे दरवाजे बंद नसतात, आमच्या पक्षाची दारं कायम खुलीच असतात. मात्र उद्धव ठाकरेंना पुढाकार घ्यावा लागेल, भाजप प्रस्ताव ठेवणार नाही, कारण त्यांनी चूक केली आहे, भाजपने चूक केलेली नाही.” असं वक्तव्य केशवप्रसाद मौर्य यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

ज्यांचे चार खासदार आहेत ते पंतप्रधान पदाची स्वप्नं पाहात आहेत. जे ५० खासदार निवडून आणू शकत नाहीत ते मोदींना रोखण्यासाठी एकत्र येत आहेत” अशी टीकाही मौर्य यांनी केली.