उद्योगात नुकसान झाल्याने कामगाराचा डोक्यात कुर्‍हाडीचा घाव घालून खून

0
61

पिंपरी, दि. 27 (पीसीबी) : उद्योगातील आर्थिक नुकसानीचा राग मनात धरून भर दुपारी उद्योजकाने कुऱ्हाडीने घाव घालून एकाचा खून केला. त्यानंतर रक्ताने माखलेली कुऱ्हाड हातात घेऊन त्याने पिंपरी पोलीस ठाणे गाठले. मी खून केला आहे, असे त्याने पाेलिसांना सांगितले. पिंपरी कॅम्पातील गेलार्ड चौकात मंगळवारी (दि. 26) दुपारी पावणेबाराच्या सुमारास ही घटना घडली. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.

महेश सुंदरदास मोटवाणी (वय 46, रा. गेलार्ड चौक, पिंपरी), असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्यांच्या पत्नीने याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. राम गोपीचंद मनवानी (वय 41, रा. गेलार्ड चौक, पिंपरी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राम मनवानी आणि महेश मोटवाणी या दोघांचेही कुटुंब पिंपरी कॅम्पातील गेलार्ड चौकात एकमेकांच्या शेजारी राहतात. राम मनवानी याची ॲल्युमिनियम फाॅईलची फॅक्टरी होती. त्या फॅक्टरीमध्ये महेश मोटवाणी हे कामाला होते. महेश यांच्यामुळे फॅक्टरीमध्ये आर्थिक नुकसान होऊन त्यांच्यामुळेच मी दिवाळखोर झालो, असे राम मनवानी याचे म्हणणे होते. महेश यांच्यामुळेच माझे आर्थिक नुकसान झाले, असा त्याचा आरोप होता. त्यातून महेश आणि राम या दोघांमध्ये वादाचे प्रकार घडले.

दरम्यान, राम मनवानी याची कंपनी बंद पडल्यानंतर महेश हे एका ऑनलाइन कंपनीसाठी ‘फूड डिलिव्हरी बाॅय’ म्हणून काम करत होते. ते नेहमीप्रमाणे मंगळवारी दुपारी पावणेबाराच्या सुमारास फूड डिलिव्हरीच्या कामासाठी घराबाहेर पडले. त्यावेळी राम मनवानी हा हातात कुऱ्हाड घेऊन थांबला होता. महेश हे घराबाहेर पडताच राम याने त्यांच्यावर कुऱ्हाडीने वार केले. यात महेश हे रक्ताच्या थारोळ्यात पडले.

महेश यांच्यावर वार केल्यानंतर राम हा रक्ताने माखलेली कुऱ्हाड घेऊन पिंपरी पोलीस ठाण्यात दाखल झाला. मी खून करून आलोय, असे त्याने पोलिसांना सांगितले. त्यामुळे पोलीस अवाक झाले. पोलिसांनी लागलीच घटनास्थळी धाव घेतली.

दरम्यान, रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या महेश मोटवाणी यांना काही नागरिकांनी पिंपरी येथील महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान महेश यांचा मृत्यू झाला. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.