उद्या हे याच पद्धतीने मुंबईचादेखील सौदा केल्याशिवाय राहणार नाहीत, फॉक्सकॉन ही तर सुरुवात आहे

0
173

मुंबई, दि. १५ (पीसीबी) – ‘वेदान्त-फॉक्सकॉन’ प्रकरणावरुन आरोप प्रत्यारोप सुरु असतानाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही हा प्रकल्प गुजरातला गेलाच कसा यासंदर्भातील चौकशी करण्याची मागणी दोन दिवसांपूर्वी केली आहे. सोशल मीडियावर केलेल्या एका पोस्टमधून राज यांनी ही मागणी केल्यानंतर आता शिवसेनेनं या मुद्द्यावरुन राज ठाकरेंना भाजपासंदर्भात इशारा दिला आहे. विशेष म्हणजे मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाच्या मदतीने एकनाथ शिंदे गट आणि मनसेमधील जवळीक वाढत असताना मुंबईचासंदर्भ देतच शिवसेनेनं हा इशारा दिला आहे.

तळेगावमध्ये ११०० एकर जागेवरील प्रकल्प गुजरामध्ये हलवण्याचा निर्णय ‘वेदान्त’ने मंगळवारी जाहीर करत गुजरात सरकारसोबत समांजस्य करार केला. याचसंदर्भात भाष्य करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी याचं खापर आधी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सत्तेत असणाऱ्या महाविकास आघाडीवर फोडलं. “या प्रकल्पास दोन वर्षांत प्रतिसाद मिळाला नसेल,” असं शिंदे म्हणाले. याचवरुन उद्धव ठाकरे संपादक असणाऱ्या ‘सामना’च्या अग्रलेखातून शिंदेंवर जोरदार टीका केली आहे.

“मुख्यमंत्री शिंदे यांनी फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेला याचे खापर आधीच्या महाविकास आघाडी सरकारवर फोडले. काय तर म्हणे, या प्रकल्पास दोन वर्षांत प्रतिसाद मिळाला नसेल. हे महाशय गेले दोनेक वर्षे त्याच सरकारचे महत्त्वाचे मंत्री होते. त्यावेळी फक्त खोक्यांची ओझी वाहण्यातच हे दोन वर्षे व्यस्त होते का?” असा प्रश्न शिवसेनेनं विचारलं आहे. “कोणत्याही कॅबिनेट बैठकीत या प्रकल्पाविषयी दिरंगाई होत असल्याविषयी त्यांनी तोंडातून ‘ब्र’ काढल्याची नोंद नाही. फडणवीसांच्या काळात आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र मुंबईतून उचलून गुजरातच्या हवाली केले तसे मुख्यमंत्री शिंदेंनी फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातच्या हातावर उदक सोडावे तसा सोडला,” असा टोला शिवसेनेनं लगावला आहे. तसेच, “उद्या हे याच पद्धतीने मुंबईचादेखील सौदा केल्याशिवाय राहणार नाहीत. फॉक्सकॉन ही तर सुरुवात आहे,” असा इशाराही शिवसेनेनं दिला आहे.

भाजपा आणि शिंदे गटामध्ये सौदा झाल्याचा आरोपही शिवसेनेनं केला आहे. “‘आम्ही तुम्हाला मुख्यमंत्रीपद दिले. तुमच्या आमदारांना पाच-सहाशे खोके दिले. त्या बदल्यात मुंबई-महाराष्ट्राच्या तिजोरीच्या चाव्या आमच्या हाती द्या’, असा हा सरळ सरळ सौदा दिसतो,” असं शिवसेनेनं म्हटलं आहे. याचसंदर्भातून शिवसेनेनं राज यांनी हा प्रकल्प गुजरातमध्ये गेल्याबद्दल चिंता व्यक्त केल्याबद्दल शिवसेनेनं समाधान व्यक्त केलं आहे. “मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी फॉक्सकॉन महाराष्ट्रातून गुजरातला गेल्याबद्दल चिंता व्यक्त केली हे बरेच झाले,” असं म्हटलं आहे. यातच पुढे शिवसेनेनं, “पण महाराष्ट्रावर आर्थिक हल्ला करणारे व येथील लाखभर तरुणांचा रोजगार हिरावून घेणारे दुसरे-तिसरे कोणी नसून त्यांचे (राज ठाकरेंचे) मित्र भाजपावालेच आहेत,” असंही म्हटलं आहे. “महाराष्ट्राच्या प्रगतीची सर्व इंजिन व डबे ते गुजरातला वळवतील. हा धोका आताच लक्षात घेतला पाहिजे,” असा इशाराही शिवसेनेनं राज ठाकरेंना दिला आहे.

हा प्रकल्प गुजरातला गेल्याचं स्पष्ट झाल्यानंतर राज यांनी ट्विटरवरुन, “फॉक्सकॉन- वेदांताचा सेमीकंडक्टर बनवण्याचा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेला. ह्या प्रकल्पाची एकूण गुंतवणूक १ लाख ५८ हजार कोटींची आहे. हा प्रकल्प पुण्याजवळ तळेगाव येथे होणार होता. प्रचंड रोजगारनिर्मितीची क्षमता असणारा प्रकल्प महाराष्ट्रातून निसटलाच कसा?” असा प्रश्न विचारला होता. “हा प्रकार गंभीर आहे. म्हणूनच या विषयाची सखोल चौकशी व्हायलाच हवी. महाराष्ट्र हे गुंतवणूकदारांच्या प्राधान्यक्रमाचं राज्य होतं. अशा राज्यातून गुंतवणुकीचा उलटा प्रवास सुरु होणं हे चांगलं लक्षण नाही. राजकारणाच्या पलीकडे जाऊन ह्या विषयाकडे बघायला हवं”, असेही ते म्हणाले होते.मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरेंच्या भेटीगाठी वाढल्याने भाजपा मनसे युतीच्या चर्चांनी राजकीय वर्तुळामध्ये जोर धरला असतानाच आता शिवसेनेनं मनसेला भाजपासंदर्भात इशारा दिला आहे.