कर्नाटक, दि. १२ (पीसीबी) : बहुतेक मतदानोत्तर सर्व्हेक्षणातून राज्यात त्रिशंकू परिस्थिती निर्माण होण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी काँग्रेस आणि भाजप दोन्ही पक्ष आतापासूनच पडद्यामागे जोरदार प्रयत्न करीत आहेत.
भाजप नेत्यांनी एका वृत्तसंस्थेला सांगितले की, सरकार स्थापन करण्यासाठी बहुमतात कमी पडल्यास त्यांच्याकडून काँग्रेस आणि धजदमधून निवडून आलेल्या आमदारांना भाजपात आणण्याचा प्रयत्न होऊ शकतो. मात्र, काँग्रेस नेते बी. के. हरिप्रसाद याला उत्तर देताना म्हणाले, ‘काँग्रेस आता कर्नाटकची जुनी काँग्रेस राहिलेली नाही. आम्ही आता विकसित झालो आहोत. आमच्या आमदारांची ‘शिकार’ करणे शक्य नाही.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डी. के. शिवकुमार आणि सिद्धरामय्या, काँग्रेसचे सरचिटणीस (संघटन) के. सी. वेणुगोपाल सतत एकमेकाच्या संपर्कात आहेत. लिंगायत नेते माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर आणि माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांच्या कॉंग्रेस प्रवेशाने कर्नाटक काँग्रेसचे नेते उत्साहात आहेत. दरम्यान, माजी मुख्यमंत्री आणि धजद नेते कुमारस्वामी म्हणाले की, आमच्या आमदारांना एकत्र ठेवले जाईल आणि मीच मुख्यमंत्री होईन. धजद नेतृत्वाला वाटते की, पक्षात अंतर्गत समस्या नसती, तर एक्झिट पोलच्या अंदाजापेक्षा जास्त जागा जिंकता आल्या असत्या.
बहुतांश मतदानोत्तर सर्वेक्षणांमध्ये यावेळी काँग्रेस मोठा पक्ष म्हणून समोर येईल, असे अंदाज वर्तविले आहेत. स्पष्ट बहुमतासाठी काही जागांची गरज भासू शकते. यासाठी निकालापूर्वी काँग्रेसच्या गोटात राजकीय हालचाली सुरू आहेत. पूर्ण बहुमताशिवाय सरकार स्थापनेसाठी काही जागांची गरज भासली तर काय करता येईल, यावर काँग्रेस नेते गंभीर चर्चा करत आहेत. काँग्रेसचे प्रदेश प्रभारी रणदीप सिंह सुरजेवाला यांच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांच्या निवासस्थानी आज राजकीय सुमारे दोन तास चर्चा झाली असून काँग्रेस नेते आज संध्याकाळी बैठकीची दुसरी फेरी घेणार असल्याचे सांगण्यात आले. त्यामध्ये डी. के. शिवकुमार यांचा सहभाग असण्याची शक्यता आहे.














































