उद्याच्या देशातील निवडणुकीत काय निर्णय होईल याची खात्री नसल्यामुळे प्रधानमंत्री अस्वस्थ – शरद पवार

0
262

पुणे, दि.३०(पीसीबी)-राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंत्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कठोर शब्दात समाचार घेतला आहे. पुणे येथे पत्रकारांसमोर विविध घडामोडींवर भूमिका मांडली.

पवार म्हणाले, महाराष्ट्रात राज्य सरकारला सत्तेत येऊन एक वर्ष झाले. या काळात राज्यात अनेक प्रश्न निर्माण झाले. परंतु माझ्या मते कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न क्रमांक एकचा आहे. यामध्ये अनेक पोटभाग असले तरी महिला आणि मुलींवरील हल्ले हा सर्वाधिक चिंतेचा भाग आहे. महिला बेपत्ता होण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. राज्यातील अशा घटनांची अधिकृत माहिती सरकारकडून मिळवली. त्यामध्ये पुणे, ठाणे, मुंबई आणि सोलापूर या महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात २३ जानेवारी ते २३ मे या कालावधीत पुणे – ९३७, ठाणे -७२१, मुंबई – ७३८, सोलापूर – ६२ अशा एकूण २४५८ महिला मागील पाच-सहा महिन्यात बेपत्ता झाल्या आहेत. तसेच बुलडाणा, धुळे, पुणे ग्रामीण, वाशिम, रायगड, अमरावती, नांदेड, बीड, चंद्रपूर, जळगाव, नंदूरबार, भंडारा, रत्नागिरी, गोंदिया या जिल्ह्यांमध्ये एकूण ४,४३१ महिला बेपत्ता आहेत. २०२२ ते मे २०२३ अ या दिड वर्षाच्या काळात एकूण बेपत्ता मुली आणि महिलांची संख्या ही ६,८८९ आहे. माझ्या मते राज्याच्या गृहमंत्र्यांनी बाकीची वक्तव्ये करण्याऐवजी या भगिनींच्या संरक्षणासाठी उपाय केले पाहिजेत. ज्या महिला बेपत्ता झाल्या त्यांचा शोध घेऊन त्यांना कुटुंबियांच्या हवाली कसे करता येईल याची खबरदारी घेण्याची अत्यंत आवश्यकता आहे.

देशाच्या प्रधानमंत्र्यांनी काही गोष्टी सांगितल्या. त्यामध्ये समान नागरी कायद्याबद्दल त्यांनी मत मांडले. केंद्र सरकारने विधी आयोगाकडे हा विषय सोपवला आहे. विधी आयोगाने देशातील विविध संस्थांचे प्रस्ताव मागवले. त्यानुसार नऊशे प्रस्ताव आले आहेत. विधी आयोगासारखी जबाबदार संस्था अभिप्रायांच्या माध्यमातून खोलात जाते, त्यातून विधी आयोगाच्या नेमक्या सूचना आणि शिफारस काय हे स्पष्ट होण्याची गरज आहे. तसेच शीख, ख्रिश्चन, जैन व तत्सम धर्मीयांची भूमिका याविषयी काय आहे, हे स्पष्ट होण्याची आवश्यकता आहे. मात्र या वर्गाला आणि त्यांच्या मताला दुर्लक्षित करणे किंवा विधी आयोगाकडे आलेल्या शिफारशींची नोंद न घेता निर्णय घेणे, हे योग्य होणार नाही. प्रधानमंत्र्यांनी या प्रश्नात हात घातला आहे. त्यामुळे या सर्व गोष्टींची स्पष्टता एकदा आली की त्यानंतर माझा राजकीय पक्ष यासंबंधीचा निर्णय घेईल. पूर्ण माहिती आल्यानंतरच निर्णय घेणे योग्य होईल. देशातील चित्र बघितल्यानंतर लोकांमध्ये सध्याच्या राज्यकर्त्यांबद्दल असलेल्या नाराजीपासून लोकांचे लक्ष अन्य ठिकाणी वळवण्याचा हा प्रयत्न आहे का, ही माझ्या मनात शंका आहे. याबाबतची अस्वस्थता प्रधानमंत्र्यांमध्ये असावी असे वाटते. याचे कारण उद्याच्या देशातील निवडणुकीत काय निर्णय होईल याची खात्री नसल्यामुळे प्रधानमंत्र्यांनी त्यांच्या पदाला अशोभनीय अशी वक्तव्यं केली आहेत.

माझ्या पक्षाबद्दलही प्रधानमंत्र्यांनी मत व्यक्त केले आहे. मुलीला प्रोत्साहित करायचे असेल तर राष्ट्रवादीला मत द्या, असे त्यांनी सांगितले. माझी मुलगी तीन वेळा पार्लमेंटमध्ये निवडून आली आहे. एखाद्या वेळी बापजाद्यांची पुण्याई उपयोगी ठरते. पण दुसऱ्या, तिसऱ्या निवडणुकीत यश मिळणे, त्यानंतर पार्लमेंटच्या कामगिरीत उच्च दर्जाचा क्रमांक ठेवणे, तिला आठ वेळा संसदरत्न पुरस्कार मिळाला. मोदी साहेबांनी काहीही सांगितले तरी स्वत:चे कर्तृत्व असल्याशिवाय देशातील मतदार नेहमीच मतं देत नाहीत. त्यामुळे पंतप्रधानांनी असे वक्तव्य करणे अशोभनीय आहे. संसदेच्या सदस्याबद्दल असे मत प्रधानमंत्र्यांनी व्यक्त करणे योग्य नाही. ही पदे या सर्व संस्था आहेत. या संस्थेची प्रतिष्ठा ठेवली पाहिजे. जे या संस्था सांभाळतात त्यांनी संसदेतील सदस्य हे देखील एक संस्थात्मक पद आहे याचे भान ठेवून त्याचा सन्मान ठेवला पाहिजे. राज्यातील चित्र पाहिल्यानंतर जे अस्वस्थ आहेत तेच अशाप्रकारचे हल्ले करतात.

शिखर बँकेबाबत कालही सांगितले की, मी कोणत्याही सहकारी बँकेचा सभासद नाही. तसेच अशा कोणत्याही सहकारी बँकेकडून कर्ज घेतलेले नाही. शिखर बँकेसंबंधी मागे झालेल्या चौकशीत राष्ट्रवादी, भाजपच्या काही लोकांची नावे आली. त्या सर्व प्रकरणाची चौकशी करण्याची जबाबदारी राज्यावर होती. राज्याचे मुख्यमंत्री पद हे भाजपकडे होते. तेव्हाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. त्यांनी काय केले हे माहिती नाही. पण शिखर बँकेचा उल्लेख करण्याची काय गरज होती याची कल्पना नाही. तसेच राष्ट्रवादीचा अशा संस्थेशी संबंध नाही, ज्याचे नावही आम्हाला माहिती नाही. पण निराशा, अमेरिकन दौऱ्यातील विश्वास आणि इथली स्थिती हे पाहिल्यानंतर त्या निराशेपोटी त्यांनी असा हल्ला केला असावा, असे पवार यांनी म्हटले आहे.