उद्धव सेनेचा स्वबळाचा नारा?

0
3

दि.21 (पीसीबी) – लोकसभा, विधानसभा निवडणुकीनंतर आता राजकीय पक्षांना मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचे वेध लागले आहेत. मुंबई महापालिका निवडणुकीची घोषणा होण्याअगोदरच ही निवडणूक प्रतिष्ठेची करण्यात आली आहे. सर्वच राजकीय पक्षांनी या निवडणुकीसाठी तयारी सुरू केली आहे. विधानसभेत दारून पराभव झाल्यानंतर आता मुंबईत उद्धव ठाकरे गटाने स्वबळाचा नारा दिला आहे. उद्धव ठाकरे गटाने एकला चलो रे चे धोरण स्वीकारल्याचे समोर येत आहे. यावर खासदार संजय राऊत यांनी भूमिका स्पष्ट केली आहे.

विधानसभेतील जागा वाटपाचा दिला दाखला

विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत जागा वाटपावरून मतभेद तीव्र झाले होते. शिवसेना आणि काँग्रेस यांच्यात तणाव वाढला होता. त्यानंतर स्थानिक नेत्यांऐवजी दिल्लीतील काँग्रेस नेतृत्वाशी बोलणी सुरू असल्याचे राऊत म्हणाले होते. आज झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी पुन्हा या जागा वाटपावरून काही जागा हातच्या गेल्याचे सूतोवाच केले. विधानसभेतील जागा वाटपाचा दाखला देत राऊत यांनी महापालिका निवडणुकीत एकला चलो रेचे संकेत दिले.

उद्धव सेनेने या निवडणुकीत स्वबळाचा नारा दिला आहे. मुंबई महापालिकेची निवडणूक कोणत्याही परिस्थितीत जिंकावीच लागणार असल्याचे संजय राऊत म्हणाले. ही निवडणूक स्वबळावर लढवावी अशी कार्यकर्त्यांची भावना असल्याचे ते म्हणाले. महाविकास आघडीच्या माध्यमातून ही निवडणूक लढवणार का? असा सवाल केल्यावर त्यांनी हे उत्तर दिले. त्यांनी याविषयीचा निर्णय उद्धव ठाकरे घेतील असे सांगीतले. पण त्यांनी पालिका निवडणूक एकटी लढवण्याचे थेट संकेत दिले आहेत.

मुंबईचे तुकडे होऊ देणार नाही

मुंबईचे तुकडे होऊ द्यायचे नसतील तर कोणत्याही परिस्थितीत शिवसेनेला ही निवडणूक जिंकावीच लागणार असे ते म्हणाले. ईव्हिएमने सगळ्यांचे निकाल लागले आहेत महापालिका निवडणुकीसंदर्भात कार्यकर्त्यांचे मनोबल जाणून घेण्यासाठी आज बैठका आहेत. चिंतन मनन करण्यापेक्षा आता पुढे गेले पाहिजे. गेल्या 70 वर्षात अशा निवडणूका पहिल्या नाहीत ज्यांनी आम्हाला मतदान केलं मात्र ते आम्हांला मिळालं नाही, असा लोकांना पक्ष बांधणी आणि निवडणुकीच्या तयारी साठी पुणे दौऱ्यावर आल्याचे त्यांनी सांगीतले.