मुंबई, दि. २० पीसीबी – राज्यात पुन्हा एकदा दिशा सालियान मृत्यू प्रकरण चर्चेत आले आहे. याचे कारण म्हणजे तिचे वडील सतीश सालियान यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यांच्या मते, दिशावर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास पुन्हा सुरू करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
सीबीआयने दिलेले प्रमाणपत्र खोटे – वकील निलेश ओझा
या प्रकरणात दिशा सालियान यांचे वकील निलेश ओझा यांनी मोठे दावे केले आहेत. त्यांच्या मते, सीबीआयने (CBI) दिलेले क्लीनचीट प्रमाणपत्र खोटे आहे. तसेच, त्यांनी आरोपींवर गँगरेप, खून आणि कट रचण्याचे आरोप लावून, त्यांच्यावर कठोर कारवाईची मागणी केली आहे.
वकील निलेश ओझा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले, “आदित्य ठाकरे, सूरज पांचोली आणि इतरांविरोधात 376D (गँगरेप), 302 (खून), 120 (कट रचणे) या कलमांखाली गुन्हे दाखल करावेत. त्यांना अटक करून लाय डिटेक्टर, नार्को टेस्ट आणि ब्रेन मॅपिंग टेस्ट करण्यात यावी. तसेच, आरोपींना मृत्युदंड मिळावा, ही आमची प्रमुख मागणी आहे.”
राशिद खान पठाण यांनी २०२४ मध्ये दिशा सालियान प्रकरणी तक्रार दाखल केली होती. त्या तक्रारीला पाठिंबा देण्यासाठी सतीश सालियान यांनी याचिका दाखल केल्याचे ओझा यांनी स्पष्ट केले. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली संपूर्ण चौकशी करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.
वकील ओझा यांनी असा दावा केला की, रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty) आणि आदित्य ठाकरे यांच्यात अनेक वर्षांपासून संबंध आहेत. त्यांच्या मते, या दोघांमध्ये ४४ वेळा फोनवर संवाद झाला होता. तसेच, दिशा सालियानच्या फ्लॅटवर आदित्य ठाकरे आणि सूरज पांचोली उपस्थित होते, याचे पुरावे त्यांच्या कडे असल्याचा दावा त्यांनी केला.
ओझा यांनी पुढे सांगितले की, “उद्धव ठाकरे यांचे सरकार हे गुंडांचे सरकार होते. त्यामुळे पहिल्या २.५ वर्षांत आम्ही न्याय मागू शकलो नाही. मात्र, त्यांचे सरकार कोसळल्यानंतर राशिद खान पठाण यांनी याचिका दाखल केली. त्या याचिकेला अधिक पाठबळ देण्यासाठी सतीश सालियान यांनीही याचिका दाखल केली आहे.”
वकील ओझा यांनी पुढे सांगितले की, “मुख्य आरोपी आदित्य ठाकरे यांच्यासोबत उद्धव ठाकरे आणि सूरज पांचोली हे देखील आरोपी आहेत. त्यामुळे या सर्वांची नार्को टेस्ट तातडीने करण्यात यावी.”