मुंबई दि. २४ (पीसीबी) –महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्यानंतर तसेच मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज पहिल्यांदा विधीमंडळात दाखल झाले आहेत. आज विधीमंडळात महाविकास आघाडीची बैठक होणार आहे, उद्धव ठाकरे या बैठकीला हजर राहणार आहेत.
सध्या राज्यात सुरू असलेल्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर आज शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधिमंडळाच्या आवारात अचानक एन्ट्री घेतल्यानंतर सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर ते पहिल्यांदाच विधीमंडळाच्या आवारात आले होते. यावेळी उद्धव ठाकरे यांच्यासोबत शिवसेनेचे विधानसभा आणि विधान परिषदेचे आमदार उपस्थित होते. यात विधान परिषद विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे, राजन साळवी, सचिन अहिर, वैभव नाईक, शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभु, सुनील शिंदे, रविंद्र वायकर, आदित्य ठाकरे हे विधीमंडळाच्या गेटपासून पायऱ्यांपर्यंत त्यांच्या सोबत चालत गेले. तसेच शिवसेना जिंदाबाद आणि कोण आला रे कोण आला शिवसेनेचा वाघ आला अशा घोषणा दिल्या. यावेळी फोटो ग्राफर आणि माध्यमांच्या कॅमेरामन यांनी उद्धव ठाकरे यांची एक झलक घेण्यासाठी एकच गोंधळ केला. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला त्यावेळी त्यांनी आपल्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा देत असल्याचे सांगितले होते. पण, अजून त्यांनी हा राजीनामा दिलेला नाही. त्यांनी तांत्रिकदृष्ट्या अजूनही ते विधान परिषदेचे आमदार आहेत. त्यामुळे त्यांना विधान परिषदेत किंवा विधीमंडळाच्या आवारात आमदार म्हणून येण्यास मुभा आहे.
राज्यातील परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी आणि पुढील रणनिती ठरविण्यासाठी विधीमंडळाच्या आवारात महाविकास आघाडीची बैठक ठेवण्यात आली होती. या बैठकीला हजर राहण्यासाठी उद्धव ठाकरे उपस्थित होते असे शिवसेनेकडून सांगण्यात आले आहे.