उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंमध्ये तीन तास चर्चा

0
3

दि. १०(पीसीबी)-आगामी महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंमध्ये एक महत्त्वाची बैठक पार पडली आहे. उद्धव ठाकरेंनी शिवतीर्थवर जाऊन राज ठाकरे यांच्यासोबत पावणे तीन तास चर्चा केल्याची माहिती आहे. मात्र, या भेटीमध्ये कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचा दावा संजय राऊत यांनी केला. उद्धव ठाकरे फक्त कुंदा मावशींना भेटायला शिवतीर्थवर गेल्याचा दावाही राऊतांनी केला.

महापालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू आहे. या चर्चेलाच बळ देणारी घटना घडली. उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षाचे नेते खासदार संजय राऊत, अनिल परब हे शिवतीर्थवर दाखल झाले. या तीनही नेत्यांनी राज ठाकरे यांच्यासोबत पावणे तीन तास चर्चा केल्याची माहिती आहे.

उद्धव ठाकरे कुंदा मावशींना भेटायला आले
या भेटीवर संजय राऊतांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, “उद्धव ठाकरे आज राज ठाकरे यांच्या निवासस्थानी आले होते. त्यामागे कोणताही राजकीय कार्यक्रम नव्हता. गणपतीच्या वेळी उद्धव ठाकरे हे राज ठाकरेंच्या घरी गेले होते. त्यावेळी असलेल्या गर्दीमुळे राज ठाकरेंच्या आईंनी, कुंदा मावशींना उद्धव ठाकरेंसोबत जास्त बोलता आलं नाही. त्यामुळे नंतर पुन्हा घरी ये असं त्यांनी उद्धव ठाकरेंना सांगितलं होतं. त्यानुसार उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांच्या घरी कुंदा मावशींना भेटायला गेले होते.”

राज-उद्धवमध्ये तीन भेटी
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये तीन महत्त्वाच्या भेटी झाल्या आहेत. मराठीच्या मुद्द्यावरून ते दोघेही एकाच स्टेजवर आले होते. त्यानंतर उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या घरी भेटायला गेले होते. तिसरी भेट ही गणपतीच्या काळात झाली. राज ठाकरे यांच्या घरच्या गणपतींच्या दर्शनासाठी उद्धव ठाकरे शिवतीर्थवर गेले होते.

या तीन भेटीदरम्यान, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना सविस्तर चर्चा करता आली नसल्याचं दिसून आलं. त्यामुळेच आगामी महापालिकेच्या निवडणुकीच्या आधी उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षाचे नेते हे राज ठाकरेंच्या शिवतीर्थवर भेटायला गेल्याची माहिती सूत्रांनी दिली. या भेटीमध्ये निवडणुकीवरही चर्चा झाल्याची माहिती आहे.

शिवाजी पार्कवर दसरा मेळव्यासाठी ठाकरेंच्या सेनेला परवानगी
दरम्यान, शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला परवानगी देण्यात आली आहे. शिवसेनेच्या स्थापनेपासून दरवर्षी शिवाजी पार्कवर शिवसेनेचा दसरा मेळावा होतो. पण शिवसेनेच्या फुटीनंतर या ठिकाणी मेळावा घेण्यासाठी शिंदे गटानेही परवानगी मागितली होती. त्यामुळे गेल्या तीन वर्षांपासून या मैदानावरील मेळाव्यासाठी दोन्ही गटांमध्ये रस्सीखेच होताना दिसते. यंदा मात्र यावर जास्त काही वाद न होता, हे मैदान उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मिळणार आहे. तर शिंदेंचा मेळावा हा आझाद मैदानावर होणार आहे.