उद्धव ठाकरेंना शिवसेना नाव आणि धनुष्यबाण परत मिळणार

0
371

मुंबई, दि. २० (पीसीबी) – राहुल नार्वेकरांनी शिवसेनेबाबत आणि राष्ट्रवादी काँग्रेसबाबत जो निर्णय दिला तो चुकीचा आहे. आम्हाला सर्वोच्च न्यायालयात न्याय मिळेल आणि उद्धव ठाकरेंना शिवसेना हे पक्षनाव तसंच धनुष्यबाण हे चिन्ह परत मिळेल असा दावा असीम सरोदे यांनी केला आहे. तसंच मराठा आरक्षण प्रकरणी मनोज जरांगे पाटील यांच्या डोळ्यांत धूळफेक केली गेली आहे असंही असीम सरोदे यांनी म्हटलं आहे.

“शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदेंना देऊन राहुल नार्वेकरांनी खूप मोठी चूक केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा तो अपमान आहे. सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय घेतला त्यात दोन गोष्टी होत्या. भरत गोगावलेंना व्हिप म्हणून मान्यता देणं बेकायदेशीर आहे असं म्हटलं होतं. तसंच एकनाथ शिंदेंना गटनेता म्हणून मान्यता देणंही बेकायदेशीर आहे सांगितलं होतं. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे १० व्या सूचीनुसार पक्षांतर बंदीचं प्रकरण असल्याने राहुल नार्वेकरांनी शेवटचा निकाल द्यावा म्हणून त्यांच्याकडे पाठवण्यात आलं होतं. सरन्यायाधीशांसह पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने हे म्हटलं होतं की अध्यक्षांनी निर्णय द्यायचा आहे कारण हे पक्षांतर बंदी कायद्याचं प्रकरण आहे. मात्र राहुल नार्वेकर म्हणतात हे पक्षांतर बंदी कायद्याचं नाही त्यामुळे कुणीच अपात्र नाही. हा निर्णय पूर्णतः चुकीचा आहे. दिशाभूल करणारा आणि बेकायदेशीर आहे.” असं असीम सरोदे यांनी म्हटलं आहे.

“राहुल नार्वेकरांना एक प्रश्न विचारला पाहिजे की हे प्रकरण पक्षांतर बंदी कायद्याचं नव्हतं तर मग त्यांना निर्णय देण्याचा कुठलाच अधिकार राहात नाही. त्यांनी एक ओळ लिहून सर्वोच्च न्यायालयाला सांगायला हवं होतं की हे प्रकरण पक्षांतर बंदी कायद्याचं नाही त्यामुळे मी ठरवू शकत नाही. संपूर्ण निर्णय त्यांना घ्यायचाच अधिकार नाही. जसा निर्णय त्यांनी शिवसेनेच्याबाबतीत दिला तसाच राष्ट्रवादीबाबतही दिला आहे जो बेकायदेशीर आहे.” असंही असीम सरोदेंनी म्हटलंय.

“उद्धव ठाकरेंना राजकीय पक्षाचा व्हिपही मिळेल, राजकीय पक्षाचं नावही मिळेल आणि धनुष्यबाण हे चिन्हही मिळेल. सर्वोच्च न्यायालयाचा जो निर्णय आहे त्याला अनुसरुनच आता पुढचा निर्णय घेतला जाईल. एकनाथ शिंदे औट घटकेचे राजे आहेत असं समजू शकतो.” असं सरोदे यांनी म्हटलं आहे.

“मनोज जरांगे पाटील यांची दिशाभूल करण्यात आली आहे. मराठा आरक्षणाचा विषय पुढे करुन त्यांचा वापर होतो आहे असं मला वाटतं आहे. सगे-सोयरे ही व्याख्या कायद्यात घ्यायची असेल तर एखादं सर्क्युलर काढून बदल होत नाही. कायद्यात बदल करावे लागतील. जरांगे पाटील यांनी मागणी केली पाहिजे की केंद्र सरकारने हा घटनात्मक बदल करावा आणि त्यांना नरेंद्र मोदींनी येऊन भेटलं पाहिजे असा आग्रह त्यांनी ठेवण्याची गरज आहे. अधिवेशनाच्या नावाखाली धूळफेक केली जाते आहे” असंही सरोदे म्हणाले आहेत.