उद्धव ठाकरेंना महाविकास आघाडीतून बाहेर काढण्याचा काँग्रेसचा आणि शरद पवार गटाचा डाव – चंद्रशेखर बावनकुळे

0
72

मुंबई, दि. २३ (पीसीबी) : महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक तोंडावर आल्यामुळे राज्यातील सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. राजकीय पक्षांनी विधानसभेच्या अनुषंगाने मोर्चेबांधणीला सुरुवात करत अनेक नेत्यांच्या बैठकांचा धडाका सुरु आहे. महायुती आणि महाविकास आघाडीतील पक्षांमध्ये जागावाटपासंदर्भात चर्चा देखील सुरु आहेत. विधानसभेला महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा प्रमुख सामना रंगण्याची चिन्ह आहेत. मात्र, असे असतानाच भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठा दावा केला आहे. “उद्धव ठाकरे यांना महाविकास आघाडीमधून बाहेर काढण्याचा काँग्रेसचा आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा प्रयत्न सुरु आहे”, असा मोठा दावा चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.

महायुतीमधून अजित पवार यांना बाहेर काढण्यात येणार असल्याच्या चर्चांवर बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे पे वर्कर यासाठी खोटा नरेटिव्ह तयार करत आहेत त्यामधून अशा प्रकारच्या बातम्या येतात. मात्र, मी तर असं म्हणतो की, उद्धव ठाकरे यांना महाविकास आघाडीमधून बाहेर काढायचा प्रयत्न काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट करत आहेत. उद्धव ठाकरेंना कबूल केलं की मुख्यमंत्री करू. पण ते उद्धव ठाकरे यांना साथ देत नाहीत. त्यांना दिल्लीत दोन दिवस बसून ठेवलं होतं. उद्धव ठाकरे देखील मुख्यमंत्री पद द्या, म्हणून दिल्लीत कटोरा घेऊन फिरत होते. मात्र, दोन दिवस राहून देखील ते तेथून मोकळा कटोरा घेऊन आले”, अशी टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.

“शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते म्हणत आहेत की, महाराष्ट्राला उद्धव ठाकरेंची गरज आहे. मात्र, दुसरं कोणीही त्यांच्याकडे पाहायला तयार नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना आघाडीमधून बाहेर काढण्याची चर्चा विदर्भात आहे. नागपूरमध्ये ठाकरे गटाला एकही जागा कोणी द्यायला तयार नाही. काँग्रेसने जाहीर केलं की नागपूरमधील सर्व जागा आम्ही लढणार, त्यामुळे उद्धव ठाकरे यांना बाहेर काढण्याचं काम महाविकास आघाडीतील दुसरे पक्ष करत असल्याचं दिसत आहे”, असा दावा चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.