पिंपरी,दि .7 (पीसीबी)
पिंपरी – चिंचवड औद्योगिक परिसरातील ज्येष्ठ कामगारनेते आणि लेखक अरुण गराडे यांना पहिल्या कविराज उद्घव कानडे स्मृती स्नेहबंध पुरस्काराने माधवराव पटवर्धन सभागृह, टिळक रस्ता, पुणे येथे सोमवार, दिनांक ०६ जानेवारी २०२५ रोजी सन्मानित करण्यात आले. लोकशिक्षक बाबा भारती प्रतिष्ठान – पिंपरी, नारायण सुर्वे साहित्य कला अकादमी आणि प्रतिमा पब्लिकेशन्स आयोजित कै. उद्घव कानडे यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ज्येष्ठ साहित्यिक आणि ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. डॉ. श्रीपाल सबनीस, महाराष्ट्र साहित्य परिषद – पुणे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह सुनीताराजे पवार, महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभा अध्यक्ष सचिन ईटकर, नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीचे अध्यक्ष सुदाम भोरे, सुप्रसिद्ध कवी अरुण म्हात्रे, श्रीमती रजनी उद्घव कानडे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. सन्मानचिन्ह, शाल, पुष्पगुच्छ असे पुरस्काराचे स्वरूप होते.
प्रा. डॉ. श्रीपाल सबनीस म्हणाले की, “अरुण गराडे यांना प्रज्ञावंत कवी उद्घव कानडे यांचा दीर्घकाळ सहवास लाभला. यंत्रावर काम करणाऱ्या हातांनी लिहिते व्हावे अशी कविवर्य नारायण सुर्वे यांची उत्कट इच्छा होती. त्यातून कामगार साहित्य परिषदेची स्थापना करण्यात आली. पिंपरी – चिंचवड परिसरात परिषदेच्या माध्यमातून अनेक साहित्यविषयक उपक्रम राबविण्यात आले. यामध्ये सुमारे पस्तीस वर्षांपासून गराडे यांनीदेखील आपले योगदान दिले आहे. त्यांनी लिहिलेल्या ‘कॉम्रेड रूपमय दादा चटर्जी’ या चरित्रात्मक ग्रंथात याविषयी ऊहापोह करण्यात आलेला आहे. कामगार आणि कष्टकरी श्रमिक यांच्यातील सुप्त प्रतिभा अभिव्यक्त होण्यासाठी असे पुरस्कार निश्चितच प्रेरणादायी ठरतील!” यावेळी ज्येष्ठ कामगार कवी प्रभाकर वाघोले यांना कविराज उद्धव कानडे स्मृती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
महेंद्र भारती यांनी प्रास्ताविक केले. पुरुषोत्तम सदाफुले, राजेंद्र वाघ, प्रदीप गांधलीकर यांनी संयोजनात सहकार्य केले. बाजीराव सातपुते यांनी सूत्रसंचालन केले. दीपक चांदणे यांनी आभार मानले.