पणजी, दि. १६ (पीसीबी) – गोव्याचे माजी मुख्यमंत्री व माजी संरक्षणमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रिकर यांचा घरवापसी होणार असल्याचे निश्चित झाल्याचे बोलले जात आहे. मागील विधानसभा निवडणुकीत उत्पल पर्रिकर यांना भाजपने उमेदवारी नाकारल्याने त्यांनी पक्षाविरोधात जाऊन अपक्ष निवडणूक लढवली होती. आता अखेर नाराजी संपली असून, पर्रिकर यांचा पुन्हा भाजपमध्ये प्रवेश होत आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांचा हा प्रवेश भाजपला बळ देणारा ठरणार आहे.
भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची उत्पल पर्रिकर यांना पुन्हा भाजपात आणण्याचा आग्रह होता. मुख्य म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांनाही पर्रिकर यांचा भाजपमध्ये पुन्हा घरवापसी व्हावे, असे वाटत होते. त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पर्रिकर यांचा भाजपमध्ये पुन्हा एकदा प्रवेश होत आहे.
मागील विधानसभा निवडणुकीत भाजपने तिकीट देण्याचे नाकारल्यानंतर उत्पल पर्रिकर यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. त्यांनी भाजप उमेदवाराविरोधात निवडणूक लढवत, भाजपची डोकेदुखी वाढवली होती. मागील विधानसभा निवडणुकीत गोव्याची राजधानी असलेल्या पणजीमधून त्यांचा अवघ्या ७१६ मतांनी निसटता पराभव झाला. असे असले तरी आपण कधीच भाजपच्या विचारधारेपासून दूर गेलो नाही, हे त्यांनी वारंवार सांगितले.
उत्पल पर्रिकर यांचा आता भाजपात घरवापसी होत असताना, पणजीतील आणि राज्यातील भाजपमधील त्यांचे प्रतिस्पर्धी अस्वस्थ झाल्याचे समजते. या प्रवेशाबाबत भाजपचे नेते बाबूश मोन्सेरात अस्वस्थ असल्याची चर्चा आहे. उत्पल पर्रिकर यांचा भाजपप्रवेशामुळे स्थामिक पातळीवरील भाजप अन विशेषत: भाजपच्या सत्ताधारी गटात चलबिचल सुरु असल्याची चर्चा आहे.