उत्तर प्रदेशातील विद्यार्थ्यांना मराठी भाषा शिकवा

0
355

– महाराष्ट्रात चांगली नोकरी मिळावी यासाठी कृपाशंकर यांचा खटाटोप

मुंबई, दि. ९ (पीसीबी) – उत्तर प्रदेशातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये मराठी विषय शिकविण्यात यावा, अशी मागणी भाजपचे नेते, माजी मंत्री कृपाशंकर सिंह यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे एका पत्राद्वारे केली. उत्तर प्रदेशातील विद्यार्थ्यांना मराठी भाषा आत्मसात झाल्यास त्यांना महाराष्ट्रात चांगली नोकरी उपलब्ध होऊ शकेल, असे कृपाशंकर सिंह यांनी पत्रात म्हटले आहे.

उत्तर प्रदेशातून रोजीरोटीसाठी अन्य राज्यांत स्थलांतरित होणाऱ्या हिंदी भाषिकांना महाराष्ट्रासह अन्य राज्यांमध्ये स्थानिक आणि परप्रांतीय वादाला सामोरे जावे लागते. या वादाला राजकीय फोडणी देण्यासाठी खासकरून आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या राजकारणासाठी भाजप नेते कृपाशंकर सिंह यांनी नवी खेळी खेळली आहे, असे बोलले जात आहे. कृपाशंकर सिंह यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना उत्तर प्रदेशातील शाळांमध्ये मराठी शिकवण्याची विनंती केली आहे. हे पत्र मराठीच्या प्रेमापोटी नसून, उत्तर प्रदेशातील तरुणांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी सोपे जावे, हा त्यामागील उद्देश असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जाते. महाराष्ट्रात इतर राज्यांमधून येत असलेल्या मजूर कामगारांमुळे राज्यातील स्थानिकांच्या रोजगारांच्या संधी मर्यादित होत असल्याचे काही पक्षांचे म्हणणे आहे. कृपाशंकर सिंह यांच्या पत्राने नवा वाद उभा राहण्याची शक्यता आहे.

आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर कृपाशंकर सिंह यांनी लिहिलेल्या पत्राचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे. स्थानिक भूमिपुत्र विरुद्ध परप्रांतीय, असा नवा वाद निर्माण करण्याचा यामागे हेतू तर नाही, अशी शंका काहींना वाटते.
दरम्यान, कृपाशंकर सिंह यांच्या या मागणीमागे मोठे राजकारण दडलेले असल्याचे सांगण्यात येते.