उत्तर प्रदेशमध्ये रेल्वेत नमाज पठण, भाजप आमदाराने केला व्हिडीओ शेअर

0
314

लखनऊ, दि. २२ (पीसीबी) – उत्तर प्रदेशमधील भाजपाचे माजी आमदार दीपलाल भारती यांनी रेल्वेतील एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये मुस्लीम बांधव रेल्वेत नमाज पठण करत असल्याचे दिसत आहे. खड्डा रेल्वेस्थानकावर रेल्वे थांबल्यानंतर नमाज पठण करण्यात आले, असे दीपलाल भारती यांनी सांगितले आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर उत्तर प्रदेशमधील गोरखपूर पोलिसांनी प्रतिक्रिया दिली आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यात येईल. त्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल, असे पोलीस अधिकारी अवधेश सिंह यांनी सांगितले आहे.

इंडिया टुडे या इंग्रजी वृत्तसंकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार सध्या व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ २० ऑक्टोबरचा आहे. या व्हिडीओमध्ये काही मुस्लीम बांधव रेल्वेमध्ये नमाज पठण करत असल्याचे दिसत आहे. हा व्हिडीओ उत्तर प्रदेशचे माजी आमदार दीपलाल भारती यांनी रेकॉर्ड केला आहे. याबाबत बोलताना “मी सत्याग्रह एक्स्प्रेसने प्रवास करत होते. यावेळी मला चार मुस्लीम रेल्वेमध्ये नमाज पठण करताना दिसले. याचा इतर प्रवाशांना त्रास होत होता,” असे भारती म्हणाले आहेत.

“मी व्हिडीओ रेकॉर्ड केला आहे. स्लीपर कोचमध्ये ते नमाज पठण करत होते. यामुळे इतर प्रवाशांना त्रास होत होता. इतरांना बाहेर जाता किंवा येता येत नव्हते. हे चुकीचे आहे,” असेही भारती म्हणाले आहेत. दीपलाल भारती यांनी याबाबत रेल्वे अधिकाऱ्याकडे तक्रार करत योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली आहे. काही दिवसांपूर्वी लखनऊमधील लूलू मॉलमध्येही काही लोक नमाज पठण करत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता.

दरम्यान, रेल्वेत नमाज पठणाचा कथित व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर गोरखपूर पोलिसांनी या प्रकाराची दखल घेतली आहे. या प्रकरणाची चौकशी केली जाईल. त्यानंतर योग्य ती कारवाई करण्यात येईल. असे पोलीस अधिकारी अवधेश सिंह यांनि सांगितले आहे.