महाराष्ट्र | दि. ६ (पीसीबी) – उत्तराखंड राज्यात मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, राज्य आपत्कालीन संचालन केंद्र, महाराष्ट्र यांच्याकडून खालील माहिती प्रसारित करण्यात येत आहे:
उत्तरकाशी जिल्ह्यातील धराली येथे ढगफुटीची घटना घडली असून खीरगंगा नदीला मोठा पूर आला होता. या घटनेमुळे अनेक घरांचे नुकसान झाले असून काही ठिकाणी भूस्खलनही झाले आहे.
महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील पर्यटक उत्तरकाशी जिल्ह्यात अडकले आहेत सदर पर्यटक किंवा त्यांचे नातेवाईक यांनी राज्य आपत्कालीन कार्य केंद्र, महाराष्ट्र बरोबर संपर्क केला असून उत्तरकाशी जिल्हा आपत्ती केंद्र व उत्तराखंड आपत्ती व्यवस्थापन केंद्र यांच्याशी सतत संपर्कात आहोत. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील 11 तसेच इतर जिल्हयातील 40 असे एकूण 51 पर्यटक सुखरूप आहेत.
आवश्यक कार्यवाहीसाठी राज्यातील जिल्हा प्रशासनास सूचना दिल्या आहेत. राज्य आपत्कालीन कार्य केंद्र, महाराष्ट्र शासन सतत परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. राज्य आपत्कालीन कार्य केंद्र, उत्तराखंड यांच्या सतत संपर्कात असून नियंत्रण कक्ष, उत्तरकाशी यांच्याशी सुद्धा संपर्क केला आहे व तेथील परिस्थितीचा आढावा घेऊन महाराष्ट्रातील पर्यटकांना लवकरात लवकर काढण्यासाठी महाराष्ट्र सदन, दिल्ली यांच्या माध्यमातून प्रयत्न चालू आहेत. आवश्यकतेनुसार पुढील सूचना प्रसारित केल्या जातील.
1) राज्य आपत्कालीन कार्य केंद्र, महाराष्ट्र
माहितीसाठी संपर्क: 93215 87143/ 022-22027990/022-22794229
2) राज्य आपत्कालीन कार्य केंद्र, उत्तराखंड
संपर्क 0135-2710334/8218867005