उत्तरकाशी दि . ८ ( पीसीबी ) – उत्तराखंडच्या सीमावर्ती जिल्ह्याच्या उत्तरकाशीमध्ये हेलिकॉप्टर कोसळून दुर्घटना घडली आहे. गंगाणीजवळ ५ ते ६ प्रवासी घेऊन जाणारे हेलिकॉप्टर कोसळलं आहे. दुर्घटनेत मुंबईतील ४ जणांसह ६ प्रवाशांचा मृत्यू झाला. सध्या उत्तराखंडमध्ये चारधाम यात्रा सुरू असताना दुर्घटना घडल्यानं यात्रेला गालबोट लागलं आहे. असे असले तरी दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टरमध्ये यात्रेकरू होते की इतर प्रवासी होते, याची अद्याप माहिती अद्याप समोर आलेली नाही.
हेलिकॉप्टर कोसळून अपघात झाल्याची माहिती मिळताच प्रशासन आणि बचावपथक घटनास्थळी रवाना झालं. अपघातामधील दोन जण जखमी असल्याचं सांगितलं जात आहे. अपघातग्रस्त हेलिकॉप्टर हे खासगी कंपनीचं आहे. स्थानिक पोलीस, सैन्यदल, आपत्ती व्यवस्थापनाचं तत्काळ प्रतिसाद पथक (क्यूआरटी), १०८ रुग्णवाहिका वाहन, तहसीलदार भटवाडी, बीडीओ भटवाडी आणि महसूल पथक अपघातस्थळी पोहोचण्याकरिता रवाना झालं आहे.
बचाव पथकाकडून मदतकार्य सुरू- हेलिकॉप्टर अपघाताची माहिती मिळताच मुख्य कॉन्स्टेबल नवीन कुमार यांच्या नेतृत्वाखाली पोस्ट भटवाडी येथून तात्काळ एक पथक रवाना करण्यात आलं. त्याचवेळी, उपनिरीक्षक पुष्कर जीना यांच्या नेतृत्वाखाली उजेली चौकीवरून दुसरी टीम अपघातस्थळाच्या दिशेनं निघाली. एसडीआरएफची टीम भटवाडी घटनास्थळी पोहोचली. पथकाला हेलिकॉप्टर सुमारे २०० ते २५० मीटर खोल खड्ड्यात पडल्याचं दिसून आलं. पथक हे बचाव कार्य करण्यासाठी खंदकात उतरले.
हेलिकॉप्टरनं जखमींना रुगणालयात आणण्यात येणार- मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त हेलिकॉप्टर एरोट्रान्स सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडचे (नोंदणी क्रमांक VT-OXF) होते. हेलिकॉप्टर सहस्त्रधारा हेलिपॅड डेहराडून येथून खरसाली हेलिपॅडच्या दिशेनं जात होते. हेलिकॉप्टरचा पायलट कॅप्टन रॉबिन सिंग होता. तर इतर सहा प्रवासी होते. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यासाठी डेहराडूनहून हेलिकॉप्टर रवाना झालं आहे. एम्स ऋषिकेश येथून हेलिकॉप्टरही घटनास्थळी पाठवण्यात आलं आहे. जखमींना ऋषिकेश एम्स रुग्णालयात आणलं जाणार आहे.
हेलिकॉप्टर अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची यादी
कला सोनी (महिला) वय ६१ वर्षे, मुंबई
विजया रेड्डी (महिला) वय ५७ वर्षे, मुंबई
रुची अग्रवाल (महिला) वय ५६ वर्षे, मुंबई
राधा अग्रवाल (महिला), वय ७९, उत्तर प्रदेश
वेदवती कुमारी (महिला) वय ४८ वर्षे, आंध्र प्रदेश
रॉबिन सिंग (पुरुष), वय ६०, गुजरात – पायलट
जखमीचं नाव
मस्तू भास्कर (पुरुष), वय 51, आंध्र प्रदेश
चारधाम यात्रेला जाण्याकरिता आहेत हेलिकॉप्टर- गंगनानी जवळील जंगलात या ठिकाणी हेलिकॉप्टर कोसळलं आहे. हे ठिकाण उत्तरकाशी जिल्हा मुख्यालयापासून सुमारे ५० किमी अंतरावर आहे. हे ठिकाण डोंगराळ आणि दुर्गम असल्यानं बचावपथकांना पोहोचण्यास ठिकाणी पोहोचण्याकरिता वेळ लागतो. उत्तरकाशी जिल्हा प्रशासनानं गंगणीजवळील जंगलात हेलिकॉप्टर कोसळल्याची पुष्टी केली आहे. चारधाम यात्रेची यमुनोत्री आणि गंगोत्री ही दोन पवित्र स्थळे उत्तरकाशी जिल्ह्यात आहेत. यावेळी यात्रेकरुंच्या सोयीसाठी यमुनोत्रीसाठी नवीन हेलिपॅड बांधण्यात आला आहे. या ठिकाणावरून यात्रेकरू चारही धाममध्ये हेलिकॉप्टरनं जाऊ शकतात. उत्तराखंडमधील हवामानही खराब असल्यानं हवाई वाहतुकीत अडचणींचा सामना करावा लागत आहे. रुद्रप्रयागमध्ये स्थित केदारनाथ धामचे दरवाजे भाविकांना दर्शनासाठी २ मे रोजी उघडण्यात आले आहेत. उत्तराखंडची ही चारधाम यात्रा पुढील ६ महिने सुरू राहणार आहे. ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये चारधाम यात्रा पूर्ण होणार आहे. त्यानंतर ६ महिने या धामांचे दरवाजे बंद राहतात.