“उत्तम शिक्षण हाच उज्ज्वल जीवनाचा मार्ग!” – एन. आर. गजभिये

0
65

पिंपरी, दि. 22 (पीसीबी) : “उत्तम शिक्षण हाच उज्ज्वल जीवनाचा मार्ग आहे!” असे विचार पिंपरी – चिंचवड न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश एन. आर. गजभिये यांनी पुनरुत्थान समरसता गुरुकुलम्, चिंचवडगाव येथे सोमवार, दिनांक २२ ऑक्टोबर २०२४ रोजी व्यक्त केले. पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती संचलित पुनरुत्थान समरसता गुरुकुलम् यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘कायदेविषयक जनजागृती शिबिर व संविधान साक्षरता’ या उपक्रमात मार्गदर्शन करताना एन. आर. गजभिये बोलत होते. पिंपरी – चिंचवड न्यायालयातील दिवाणी न्यायाधीश एस. एन. गवळी, क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती अध्यक्ष पद्मश्री गिरीश प्रभुणे, कार्यवाह ॲड. सतिश गोरडे, कोषाध्यक्ष रवींद्र नामदे, ॲड. सुहास पडवळ, ॲड. राजेश पुणेकर, सरकारी अभियोक्ता ॲड भूषण पाटील , ॲड संजय राठोड आदी मान्यवरांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी गुरुकुलम् मधील विद्यार्थ्यांच्या प्रातिनिधिक मनोगतातून आईवडिलांची गुन्हेगार पार्श्‍वभूमी, पोलिसांचा ससेमिरा, पालकांची बेरोजगारी आणि आर्थिक हलाखीची परिस्थिती, मुलांची उच्च शिक्षण घेण्याची महत्त्वाकांक्षा अशा बाबी स्पष्ट झाल्यावर एन. आर. गजभिये पुढे म्हणाले की, “गुरुकुलम् मधील ही संध्याकाळ माझ्यासाठी संस्मरणीय आहे.

मानवी जीवनात सुख – दुःख येत असते; परंतु त्याला कसे सामोरे जायचे हे आपणच ठरवायचे असते. आईवडिलांची गुन्हेगार पार्श्‍वभूमी हा मुलांचा दोष नाही. गुरुकुलम् सारखे शैक्षणिक संकुल भटक्याविमुक्त मुलांमधील सुप्तगुणांना वाव देण्याचे मोठे काम करीत आहे. न्यायापासून वंचित असलेल्या सामाजिक घटकांना त्वरित आणि शासकीय खर्चाने न्याय मिळावा म्हणून न्यायव्यवस्था प्रयत्नशील आहे. आधार कार्ड आणि तत्सम कागदपत्रे मिळवणे हा प्रत्येक भारतीय नागरिकाचा मूलभूत हक्क आहे. त्यासाठी सक्षम अधिकार्‍यांची मदत मिळवता येईल. विद्यार्थ्यांची भूतकाळातील कौटुंबिक पार्श्‍वभूमी बदलणे शक्य नसले तरी त्यांना घडविण्याची जबाबदारी पालक म्हणून इथल्या शिक्षकांचीच आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या महापुरुषांचा विद्यार्थिदशेतील संघर्षाचा आदर्श त्यांच्यापुढे ठेवा. त्यांचा शिक्षणातील कल ओळखून भावी काळात त्यांच्यातून पद्मश्री, गुरुकुलचे प्रमुख, उच्चपदस्थ अथवा प्रथितयश कलावंत निर्माण होतील असे शिक्षण द्यावे!” असे आवाहन त्यांनी केले. ॲड. एस. एन. गवळी यांनी एकलव्य आश्रम, यमगरवाडी येथील भटक्याविमुक्त समाजासाठीचा प्रकल्प यांचे संदर्भ उद्धृत करीत गुरुकुलम् मधून गुणवंत विद्यार्थी निर्माण व्हावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली.

दीपप्रज्वलन, भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन आणि विद्यार्थिनींनी सादर केलेल्या स्वागतगीताने कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. गिरीश प्रभुणे यांनी प्रास्ताविकातून, “न्यायदेवतेच्या डोळ्यांवरील पट्टी काढल्याने आता अधिक डोळसपणे न्यायदानाचे कार्य होईल!” अशी अपेक्षा व्यक्त करून पारंपरिक कलाकौशल्यांना उत्तेजन मिळावे अशीच गुरुकुलम् मधील शिक्षणपद्धती आहे, अशी माहिती दिली. विद्यार्थ्यांनी ईशावास्योपनिषद आणि कबीराच्या निवडक दोह्यांचे सामुदायिक पठण करून मान्यवरांना प्रभावित केले. सतीश अवचार यांनी सूत्रसंचालन केले. पूनम गुजर यांनी आभार मानले. ॲड सोहम यादव, ॲड महेश सोनवणे, ॲड. अक्षय भालेराव, ॲड. सौरभ साठे, ॲड. आशिष गोरडे, वर्षा जाधव, अश्विनी बाविस्कर, नटराज जगताप, मारुती वाघमारे, अतुल आडे, समर्थ डोंगरे यांनी संयोजनात सहकार्य केले.