उज्वला योजना फोल ठरली ? ४ कोटी लाभार्थ्यांनी एकदाही रिफिल केला नाही एलपीजी सिलेंडर

0
500

नवी दिल्ली,दि.०६(पीसीबी) – ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या तारखेला कमर्शियल गॅस सिलेंडरच्या किमतीत कपात करण्यात आली, पण घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती जैसे थे आहेत. सरकारने केवळ प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसाठी सबसिडी ठेवली आहे. इतर एलपीजी ग्राहकांसाठी सबसिडी रद्द करण्यात आली आहे. परंतु सरकारच्या एका आकडेवारीतून धक्कादायक बाब समोर आली आहे. सरकारने संसदेत सादर केलेल्या आकडेवारीवरुन असं समोर आलं, की उज्ज्वला योजनेच्या मोठ्या संख्येने लाभार्थींनी एलपीजी सिलेंडर एकदाही रिफिल केलेलं नाही. केंद्र सरकारने मागील काही दिवसांत उज्ज्वला योजनेअंतर्गत देण्यात आलेल्या गॅस कनेक्शनच्या रिफिलिंगची आकडेवारी सांगितली. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू राज्यमंत्री रामेश्वर तेली यांनी राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात याबाबत माहिती दिली.

राज्यमंत्री रामेश्वर तेली यांनी दिलेल्या माहितीनुसार, उज्ज्वला योजनेच्या ४.१३ कोटी लाभार्थ्यांनी एकदाही एलपीजी सिलेंडर रिफिल केलेलं नाही. तर ७.६७ कोटी लाभार्थ्यांनी एकदाच सिलेंडर रिफिल केला आहे. विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांची माहिती मागितली होती. त्यावेळी उज्ज्वला योजना, तसंच सबसिडीबाबत ही माहिती, आकडेवारी देण्यात आली. सध्या केवळ उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसाठी सबसिडी आहे.

रामेश्वर तेली यांनी दिलेल्या माहितीनुसार, २०१७-२०१८ दरम्यान ४६ लाख उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांनी एकही सिलेंडर रिफिल केला नाही. तर केवळ एकदाच रिफिल करणाऱ्यांचा आकडा १.१९ कोटी होता. २०१८-२०१९ दरम्यान १.२४ कोटी, २०१९-२०२० दरम्यान १.४१ कोटी, २०२०-२०२१ दरम्यान १० लाख आणि २०२१-२०२२ दरम्यान ९२ लाख लाभार्थ्यांनी एकदाही एलपीजी गॅस सिलेंडर या योजनेंतर्गत रिफिल केला नाही. एकदाही सिलेंडर रिफिल न करणाऱ्यांसह त्यांनी एकदा सिलेंडर रिफिल करण्यांचीही आकडेवारी दिली आहे.

२०१८-२०१९ दरम्यान २.९० कोटीस २०१९-२०२० दरम्यान १.८३ कोटी, २०२०-२०२१ दरम्यान ६७ लाक आणि २०२१-२०२२ दरम्यान १.०८ कोटी उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांनी केवळ एकदा सिलेंडर रिफिल केला आहे. त्याशिवाय २०२१-२०२२ दरम्यान एकूण ३०.५३ कोटी घरगुती गॅस धारकांपैकी २.११ कोटी लाभार्थ्यांनी एकदाही गॅस सिलेंडर रिफिल केला नाही. तर २.९१ कोटी ग्राहकांनी एकदा घरगुती गॅस सिलेंडर भरला आहे. एप्रिल २०२० पर्यंत उज्ज्वला गॅस सिलेंडरवर गरीबांना १६२ रुपये सबसिडी परत मिळत होती.

सरकारने उज्ज्वला योजनेअंतर्गत ९ कोटी मोफत गॅस कनेक्शन दिले आहेत. या सर्व लाभार्थ्यांना एलपीजी सबसिडी म्हणून २०० रुपये प्रति सिलेंडर निश्चित केले आहेत. सरकारने वर्षाला १२ सिलेंडरवर सबसिडी देण्याचा नियम केला आहे. २१ मे २०२२ ते २०२२-२०२३ पर्यंत सरकारने हे नियम ठरवले आहेत. उज्ज्वला योजनेंतर्गत सरकार गरीब कुटुंबातील महिलांना मोफत गॅस कनेक्शन देते.

LPG गॅस कनेक्शनवर मिळणाऱ्या सबसिडीसाठी लाभार्थ्यांना आधार नंबर लिंक करणं आवश्यक आहे. यासाठी सर्वात आधी UIDAI च्या Resident Self seeding वेब पेजवर माहिती भरावी लागेल. त्यानंतर LPG सिलेक्ट करुन स्कीमचं नाव टाकावं लागेल. आता डिस्ट्रिब्यूटरचं नाव सिलेक्ट करा. कंज्यूमर नंबर, मोबाईल नंबर, ईमेल आयडी, आधार नंबर सबमिट करा. त्यानंतर मोबाईलवर OTP येईल. ओटीपी टाकल्यानंतर याचं नोटिफिकेशन रजिस्टर्ड मोबाईलवर येईल आणि एलपीजी कनेक्शन आधारशी लिंक होईल.