उच्च न्यायालयाच्या नोटीसबद्दल मनोज जरांगें म्हणाले…

0
150

पुणे, दि. २४ (पीसीबी) – मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांचा जालन्याच्या अंतरवली सराटी गावाहून निघालेला मोर्चा आता पुण्यापर्यंत पोहोचला आहे. हा मोर्चा आता पुण्याच्या येरवडाला पोहोचला आहे. मनोज जरांगे यांच्या या मोर्चा आणि मुंबईतील आंदोलनाच्या विरोधात वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज सुनावणी झाली. जरांगे यांच्यासोबत लाखो आंदोलक मुंबईच्या दिशेला येत आहेत. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होऊ शकतो, असा मुद्दा सदावर्ते यांच्याकडून मांडण्यात आला. कोर्टाने मनोज जरांगे यांच्या मोर्चाला मुंबईत परवानगी नाकारावी, अशी मागणी सदावर्ते यांनी केली. न्यायमूर्ती अजय गडकरी यांनी सदावर्ते आणि राज्याचे महाधिवक्ता रविंद्र सराफ यांचा युक्तिवाद ऐकून घेतला. त्यानंतर न्यायमूर्तींनी पोलिसांना महत्त्वाचे निर्देश दिले. “मनोज जरांगेंना उच्च न्यायालयात हजर होण्याबाबत नोटीस बजावा. आझाद मैदान पोलिसांनी जरांगे यांना नोटीस बजावावी. आझाद मैदानात 5 हजार पेक्षा जास्त लोक येवू शकत नाही हे देखाल कळवण्यात यावे”, असे निर्देश न्यायमूर्तींनी दिले. मुंबई हायकोर्टाच्या या निकालावर आता मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली.

मनोज जरांगे नेमकं काय म्हणाले?
“न्यायालय आम्हालाही न्याय देईल. न्यायमूर्ती आम्हालाही न्याय देतील. आमचेही वकील कोर्टात जातील. काय नोटीस आहेत ते बघू. आमचे वकील आहेत ते बघतील. न्याय मंदिर सगळ्यांसाठी आहे. त्यात काय एवढं घाबरण्यासारखं आहे? न्याय मंदिर आम्हालाही न्याय देईल. त्यात मला काही एवढं विशेष वाटत नाही. न्याय मंदिरासमोर त्यांनी जी बाजू मांडली त्यावर त्यांना न्याय दिला. आमची बाजू आम्ही मांडू, आम्हालाही न्याय मंदिराचा दरवाजा उघडा आहे. न्याय मंदिर आम्हालाही न्याय देणार”, अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे यांनी दिली.

‘आपण एकमेकांच्या भावना समजून घेतल्या पाहिजे’
ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांनी मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोठा इशारा दिला आहे. मनोज जरांगे यांच्या मागण्या सरकारने मान्य केल्या तर आम्हीसु्द्धा 4 कोटी ओबीसींना घेऊन मुंबईत मोर्चा काढू, असा इशारा तायवाडे यांनी दिला. याबाबत जरांगे यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी भूमिका मांडली. “तुम्ही 35 कोटींचा मोर्चा काढा. आम्हाला काय? आमची लढाई सरकारसोबत आहे. तुम्ही कितीचेही मोर्चा काढा. आमचं काहीच म्हणणं नाही. त्यांनी केलं म्हणून आम्ही कधी करत नाही. विरोधाला विरोध करायचं असं नाही. पण माणुसकीने वागायला पाहिजे. आपण एकमेकांच्या भावना समजून घेतल्या पाहिजे. मोर्चा काढण्याचा अधिकार लोकशाहीने सर्वांना दिला आहे. त्यामुळे ते देखील काढू शकतात”, अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटील यांनी दिली.