पुणे, दि . 23 ( पीसीबी ) : पुण्यातील उच्च पदस्थ अधिकारी असलेल्या पतीने आपल्याच उच्च पदस्थ असलेल्या पत्नीचे घरात स्पाय कॅमेरा लावून आंघोळीचा व्हिडीओ काढून तो व्हायरल करण्याची धमकी दिल्याचा आरोप महिला अधिकाऱ्याने केला आहे. सोबतच हे व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत माहेरून गाडी आणि कारच्या हफ्त्याकरिता दीड लाख रुपये आणण्याची जबरदस्ती केल्याचाही आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी महिला अधिकाऱ्याने आंबेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार आंबेगाव पोलिसांनी पती आणि सासरच्या 7 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पती-पत्नी दोघेही क्लास वन अधिकारी आहेत. मात्र पतीच्या डोक्यावर संशयाचं भूत होतं, उच्चपदस्थ पत्नीवर संशय घेऊन तिच्यावर नजर ठेवण्यासाठी पतीने स्वतःच्याच घरातील बाथरूममध्ये कॅमेरे बसवून व्हिडीओ रेकॉर्ड केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पतीने हे व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत पत्नीला ब्लॅकमेल केल्याचेही समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी अधिकारी पतीसह सासरच्या सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पीडित 30 वर्षीय क्लास वन अधिकारी महिलेने या प्रकरणी आंबेगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पीडितेचे 2020 मध्ये लग्न झाले होते. मात्र, लग्नानंतर पतीने तिच्यावर सतत संशय घेऊन मानसिक व शारीरिक छळ करण्यास सुरुवात केली. तिला शिवीगाळ, मारहाण करून वारंवार माहेराहून पैसे आणण्याचा दबाव टाकत होता. दीड लाख रुपये माहेरून आणण्याची तो जबरदस्ती करत होता. याच संशयातून पत्नीवर सतत नजर ठेवण्यासाठी घरात, विशेषतः बाथरूममध्ये स्पाय कॅमेरे बसवले. व्हिडीओ रेकॉर्ड करून ते व्हायरल करण्याची धमकी देत मानसिक त्रास दिला. या सोबतच सासू, सासरे, दीर आणि इतर नातेवाइकांनीही तिला त्रास दिल्याचा आरोप महिलेने केला आहे. पतीकडून सातत्याने होणारा मानसिक व शारीरिक छळ आणि ब्लॅकमेलिंग सहन न होताच पीडितेने अखेर पोलिसांकडे मदत मागितली.
तिने पतीसह सासरच्या सात जणांविरुद्ध आंबेगाव पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी तांत्रिक पुरावे, व्हिडिओ फुटेज आणि इतर तपशिलांची तपासणी सुरू केली असून, आरोपींवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याची माहिती आंबेगाव पोलिसांनी दिली.
सन 2020 मध्ये पीडितेचे लग्न झालं होतं. त्यानंतर त्यांचा संसार सुखाचा सुरु होता. मात्र काही वर्षात पतीला पत्नीवर संशय आला. त्याने तिला त्रास द्यायला सुरुवात केली. वारंवार पैशासाठी त्रास देत होता. सोबतच तिच्यावर नजर ठेवण्यासाठी स्पाय कॅमेरेदेखील घरात बसवून घेतले होते. त्या अधिकाऱ्याला आपल्या पत्नीवर संशय होता. त्यामुळे त्याने घरात स्पाय कॅमेरे लावले होते. ऑफिसमध्ये गेल्यावर तो अधिकारी त्याच्या क्लास वन ऑफिसर असलेल्या पत्नीवर नजर ठेवायचा. त्यानंतर त्या अधिकाऱ्याने स्वतःच्या बाथरूममध्येही स्पाय कॅमेरे लावले. त्या माध्यमातून पत्नीचे आंघोळीचे व्हिडीओ त्याने रेकॉर्ड केल्याचं समोर आलं.