पिंपरी, दि. २७ (पीसीबी) – केंद्र सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने नागरिकांच्या आरोग्यासाठी राष्ट्रीय टेली कन्सल्टेशनच्या माध्यमातून ऑनलाईन ओपीडी सेवा सुरू केली आहे. ऑनलाईन पद्धतीने रुग्णांना त्यांच्या आजारावर सल्ला आणि उपचार दिले जातात. या सेवा ‘ई-संजीवनी ओपीडी सेवा’ असे नाव दिले आहे. औंध येथील जिल्हा रुग्णालयात जवळपास दीड वर्षांपूर्वी ई-संजीवनी सेवा सुरू करण्यात आली आहे. या सेवेचा दीड वर्षात आतपर्यंत 25 हजार रुग्णांनी लाभ घेतला आहे.
ही सेवा मोफत आहे. त्याचबरोबर सर्वच प्रकारच्या आजारांवर मार्गदर्शन आणि उपचार मिळत असल्याने या सेवेला रुग्णांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. मे मध्ये 3968 रुग्णांची या सेवेचा लाभ घेतला तर जूनमध्ये 2430 रुग्णांनी ई-संजीवनीच्या माध्यमातून उपचार घेतले आहेत. यावरून रुग्णांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येते. पुणे जिल्ह्यातील 73 डॉक्टर या माध्यमातून रुग्णांना सेवा देत आहेत. त्याचबरोबर 1800 आशाताई आणि त्यांचे समन्वयक, कम्युनिटी हेल्थ ऑफिसर, प्राथमिक आरोग्य केंद्रांतील वैद्यकीय अधिकारी हे देखील सेवेत काम करत असतात.
असा करा वापर?
ज्या नागरिकांना या सेवेचा लाभ घ्यायचा आहे. त्यांनी http://esanjeevaniopd. या संकेतस्थळावर नोंदणी करावी तसेच मोबाईलच्या माध्यमातून प्ले स्टोरवरून हे ॲप डाऊनलोड करूनदेखील नोंदणी करता येते. या सेवेद्वारे डॉक्टरांनी उपचाराचा सल्ला दिल्यानंतर ॲपमध्ये किंवा संकेतस्थळावर त्वरित औषधांची प्रिस्क्रिप्शन उपलब्ध होते. या प्रिस्क्रिप्शनची प्रिंट काढून खासगी मेडिकल किंवा शासकीय रुग्णालयातील औषधी विभागाकडून औषधी घेता येतात.
काय आहे ‘ई संजीवनी’?
नागरिकांना घरबसल्या वैद्यकीय सेवा मिळावी. यासाठी ही सुविधा आहे. या सेवेच्या माध्यमातून कोणत्याही नागरिकाला डॉक्टरांशी सल्लामसलत करता येते. ही सेवा ऑनलाईन पद्धतीने असून मोफत आहे. विशेषत: ग्रामीण भागातील नागरिकांनादेखील याचा लाभ होत आहे. ई-संजीवनी ओपीडी सेवा सकाळी 9 पासून दुपारी 1 पर्यंत ऑनलाईन सुरू असते. तर, दुसऱ्या सत्रात दुपारी 1.45 पासून संध्याकाळी 5 पर्यंत ऑनलाईन सेवा सुरू असते.
सर्व आजारांवर उपचार ?
स्पेशालिटी ओपीडीवर क्लिक केल्यास ॲनेस्थेशिया, आयुर्वेदिक, कार्डियॉलॉजी, चेस्ट मेडिसिन, डेंटल, डमॅटोलॉजी, कान, नाक, घसा तज्ज्ञ, जनरल मेडिसीन, जनरल फिजिशियन, जनरल सर्जरी, होमिओपॅथी, इंटरनल मेडिसिन, ओबीजी, ऑर्थोपिडिक्स , पेडियाट्रीक सर्जरी, आदींवर मार्गदर्शन आणि उपचार दिले जातात.