ई-प्रशासन: पीसीएमसी स्मार्ट सारथी प्रकल्प राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित

0
24

महापालिकेच्या प्रकल्प ठरतोय देशासाठी रोल मॉडेल

पिंपरी, दि. ३ – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पीसीएमसी स्मार्ट सारथी प्रकल्पाला केंद्र शासनाच्या कार्मिक, सार्वजनिक तक्रारी व निवृत्तीवेतन मंत्रालयाच्या प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार निवारण विभागाच्या वतीने ‘ई-गव्हर्नन्स स्कीम २०२३-२४’ अंतर्गत डिस्ट्रीक्ट लेव्हल इनिशिएटीव्ह्ज इन ई-गव्हर्नन्स’(ई-प्रशासनामध्ये जिल्हास्तरीय उपक्रम) या श्रेणीमध्ये सिल्व्हर अवॉर्ड (द्वितीय क्रमांक) या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी हा पुरस्कार स्वीकारला. प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह आणि रोख पाच लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

यावेळी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे मुख्य माहिती तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण, माहिती तंत्रज्ञान अधिकारी विजय बोरुडे आणि फॉक्सबेरी टेक्नोलॉजिजचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित भार्गव उपस्थित होते.

प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार निवारण विभाग (डीएआरपीजी), इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय (एमईआयटीवाय) आणि महाराष्ट्र राज्य सरकारच्या सहकार्याने ३ व ४ सप्टेंबर, २०२४ रोजी मुंबई येथे २७वी राष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली आहे. या दोन दिवसीय परिषदेचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंग, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झाले.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने पीसीएमसी स्मार्ट सारथीच्या माध्यमातून नागरिकांना अनेक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून. प्रशासनामध्ये तंत्रज्ञानाचा प्रभावीपणे वापर केल्यामुळे महापालिकेला राष्ट्रीय स्तरावर सन्मानित करण्यात येणार आहे.

सदर पुरस्कार सोहळ्यामध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेसह संपूर्ण देशभरातून पाचशेपेक्षा जास्त संस्थांनी सहभाग नोंदवला. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या लोकाभिमुख कामकाजासाठी महापालिकेला या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. महापालिकेच्या वतीने आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून अने लोकोपयोगी प्रकल्प राबविण्यात येत आहेत. त्यामध्ये नागरिकांना ऑनलाईन सेवा सुविधा उपलब्ध करून देणारे पीसीएमसी स्मार्ट सारथी मोबाईल अॅप्लिकेशन, दोन वर्षांमध्ये मिळकत कर संकलनामध्ये ५९% वाढ करणारा प्रॉपर्टी टॅक्स इम्प्रूव्हमेंट प्रोग्राम आणि आकडेवारीवर आधारित निर्णय घेण्यासाठी राबविण्यात येणारा सिटीझन हब फॉर डेटा अँड कम्युनिकेशन(सीएचडीसी) या प्रकल्पांचा समावेश आहे. या प्रकल्पांमुळे नागरिकांना सेवासुविधा उपलब्ध करून देण्याची कार्यक्षमता वाढली आहे. तसेच कर संकलनामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. सदर पुरस्कार मिळाल्यामुळे पिंपरी चिंचवडच्या नावलौकिकामध्ये भर पडली असून शहराचे नाव राष्ट्रीय स्तरावर अधोरेखित झाले आहे.