ईव्हीएम मशीन घोटाळा विरोधात विरोधक आक्रमक, मोठे आंदोलन छेडणार

0
39

मुंबई, दि. 26 (पीसीबी) : विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. तर दुसरीकडे विरोधकांनी ईव्हीएमविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. आज मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात पराभूत उमेदवारांची बैठक झाली. या बैठकीत ईव्हीएम मशीनविरोधात मोठं आंदोलन उभारण्यासंदर्भात उद्धव ठाकरे यांनी सुतोवाच केलं आहे. महाविकास आघाडी एकत्रित येऊन ईव्हीएमविरोधात आंदोलन करण्याची शक्यता आहे.

मातोश्रीवरील बैठकीत काय घडलं?
विधानसभेच्या निवडणुकीत पराभूत उमेदवारांनी ईव्हीएम मशीन आणि मतमोजणी प्रक्रियेत झालेल्या गोंधळासंदर्भात पाढा वाचला. यानंतर उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीतील इतर नेत्यांशी बोलून ईव्हीएम मशीन घोटाळाविरोधात आक्रमक भूमिका घेण्याच्या तयारीत आहेत. जिथे-जिथे ईव्हीएम आणि मतमोजणीमध्ये गोंधळ झाला आहे त्या ठिकाणी सर्व पराभूत उमेदवारांना व्हीव्हीपॅट मतमोजणीसाठी निवडणूक आयोगाला अर्ज करण्याच्या सूचना केले आहेत. किमान पाच टक्के तरी व्हीव्हीपॅट मतांची तपासणी करावी, अशी सूचना देखील उद्धव ठाकरेंनी पराभूत उमेदवारांना दिल्या आहेत. दरम्यान, आजच्या बैठकीत सर्वच पराभूत उमेदवारांनी ईव्हीएम मशीनच्या गोंधळात संदर्भात रोष व्यक्त केला. त्यामुळे येणाऱ्या काळात याच कथित ईव्हीएम मशीन घोटाळ्या संदर्भात एक मोठं आंदोलन उभारण्याची तयारी महाविकास आघाडीकडून केली जाण्याची शक्यता आहे.

125- विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीचा निकाल दि. 23/11/2024 रोजी जाहीर केला आहे. आपण दिलेल्या निकालावरती संशय निर्माण झालेला आहे. त्यामुळे आक्षेप नोंदवित आहात दि. 26/04/2024 रोजी सुप्रीम कोटांचे आदेशानुसार निवडणूक निकाला नंतरही 7 दिवसाच्या आतमध्ये EVM आणि VVPAT च्या पडताळणीची मागणी दुसन्या व तिस-या क्रमांकाचे उमेदवार मागणी करू शकतात, त्यामूळे निवडणूक प्रक्रिया मतमोजणी प्रक्रिया संशयास्पद वाटत असल्याने सोबत मतदान केंद्राची यादी जोडलेली असून त्यानुसार EVM मायक्रो कंट्रोलर व VVPAT ची पडताळणी करून निर्माण झालेला संशय दूर करावा ही विनंती.

शरद पवारांचीही ईव्हीएमविरोधात आक्रमक भूमिका-
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकीत उमेदवारांनी केलेल्या ईव्हीएमविरोधातील तक्रारी संदर्भात एक वकिलांची टीम करण्याचा शरद पवारांनी निर्णय घेतला आहे. राज्यपातळीवर एक आणि केंद्रीय पातळीवर कायदेशीर लढाई लढण्यासाठी वकिलांची टीम गठित करण्यात आल्याची सूत्रांची माहिती समोर आली आहे. शरद पवारांकडून केवळ आरोप करण्यापेक्षा ईव्हीएमबाबत जे आक्षेप आहेत किंवा निवडणूक प्रक्रियेत ज्या चुकीच्या बाबी घडल्या ते सर्व पुरावे गोळा करण्याच्या उमेदवारांना सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच 28 तारखेपर्यंत व्हीव्हीपॅट तपासणीसाठी वेळ असल्याने उमेदवारांनी तत्काळ व्हीव्हीपॅट तपासणी करावी, अशी ही सूचना देण्यात आली आहे. राज्य पातळीवर ज्या प्रकारे लढाईला सुरूवात करण्यात आली, त्याचप्रमाणे इंडिया आघाडी देखील लढाई लढणार, असं शरद पवार म्हणाले. आता मागे हटायचं नाही लढायचं, असा संदेश देखील शरद पवारांनी पराभूत उमेदवारांना दिला आहे