ईडी चौकशीची भीती घालत तरुणाची पावणे पाच लाखांची फसवणूक

0
215

वाकड , दि. ५ (पीसीबी) – बँक खात्याची एडी चौकशी सुरू असल्याची भीती घालत चौकशी क्लिअर करण्याच्या बहाण्याने चार लाख 74 हजार रुपये घेत तरुणाची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार चार सप्टेंबर रोजी सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास भुमकर चौक वाकड येथे घडला.

अक्षय संतोष देशपांडे (वय 27, रा. भुमकर चौक, वाकड) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार 84550110065 क्रमांक धारक शिवम शर्मा आणि एक अनोळखी व्यक्ती यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शिवम शर्मा याने फिर्यादी यांना फोन करून फिर्यादी यांच्या आधार कार्डचा वापर करून तैवान येथे पार्सल पाठवले असल्याचे सांगितले. त्यानंतर त्याच्या वरिष्ठांशी बोला, असे म्हणत त्याने दुसऱ्या व्यक्तीस बोलण्यासाठी फोन दिला. फोनवरील दुसऱ्या व्यक्तीने फिर्यादी यांच्या बँक खात्यावरून बेकायदेशीर व्यवहार होत असल्याचे सांगितले. त्या खात्यांची ईडीची चौकशी सुरू आहे, असेही फोनवरील दुसऱ्या व्यक्तीने सांगितले. चौकशी क्लिअर करण्यासाठी तीन टप्प्यांमध्ये चार लाख 74 हजार 531 रुपये फिर्यादीस भरण्यास भाग पाडले. यामध्ये फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादींनी पोलिसात धाव घेत गुन्हा नोंदवला. वाकड पोलीस तपास करीत आहेत.