ईडी चा त्रास टाळण्यासाठी आता माजी मंत्री अर्जून खोतकर शिंदे गटात

0
323

जालना, दि. २५ (पीसीबी) : शिवसेनेचे जालन्यातील माजी आमदार अर्जुन खोतकर यांनीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दिल्लीत भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. तेही शिंदे गटात दाखल होणार अशा चर्चा सुरू झाल्या असून काही दिवसांपूर्वी त्यांच्यावर साखर कारखान्यातील गैरव्यवहाराप्रकरणी ईडीची धाड पडली होती. शिंदे गटात सामिल झालेल्य भावना गवळी, प्रताप सरनाईक, यामिनी जाधव यांनी ईडी चा त्रास टाळण्यासाठी ठाकरे यांची साथ सोडली आता खोतकर यांच्यावर ती वेळ आल्याची चर्चा आहे.

जालन्याचे माजी आमदार अर्जुन खोतकरांनी शिवसेनेला रामराम ठोकून शिंदे गटाचा रस्ता धरला तर मराठवाड्यातही शिवसेनेला मोठा धक्का बसणार आहे. त्यांनी आज एकनाथ शिंदे यांची भेट घेतली असून त्यावेळी भाजपचे नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे उपस्थित होते. पण या भेटीचा वेगळा उद्देश काढू नका मी शेवटपर्यंत उद्धव ठाकरे यांच्यासोबतंच राहणार असल्याचं खोतकर यांनी सांगितलं आहे. काही दिवसांपूर्वीच शिवसेनेने त्यांनी उपनेतेपद दिलं होतं.

दरम्यान, जालना सहकारी साखर कारखान्याच्या बेकायदा लिलावाशी संबंधित प्रकरणात ‘ईडी’ने कारखान्याची इमारत, यंत्रसामग्री, जमीन आदी जप्त केली असल्याची माहिती ‘ईडी’ने दिली होती. शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी या साखर कारखाना खरेदीत शंभर कोटींचा गैरव्यवहार केल्याचा आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी औरंगाबाद येथे काही महिन्यांपूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला होता. त्यानंतर ईडीने ही कारवाई केली होती.

‘ईडी’च्या पथकाने २६ नोंव्हेबर २०२१ ला खोतकर यांच्या निवासस्थानी, तसेच जालना कृषी उत्पन्न बाजार समिती आणि जालना साखर कारखाना या ठिकाणी दोन दिवस छापे घातले होते. शिवाय खोतकरांची चौकशी केली होती. त्यानंतर मार्च २०२२ मध्ये रामनगर येथील जालना साखर कारखन्याची मालमत्ता, जमीन आणि यंत्रसामग्री विक्री करण्यास परवानगी देऊ नका, असे पत्र ‘ईडी’कडून जिल्हाधिकाऱ्यांना पाठविले होते.