मुंबई, दि. १० (पीसीबी)- भारताला आज खंबीर नेतृत्त्वाची गरज असून मोदींच्या नेतृत्त्वाखाली देश पुढे जाण्यासाठी राज्यातील महायुतीला बिनशर्त पाठिंबा देत असल्याची घोषणा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात केली. यावरून राज ठाकरेंवर आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही त्यांच्यावर टीकास्त्र डागलं आहे.
अंजली दमानिया म्हणाल्या, राज ठाकरे काल चुकचुकल्यासारखे आणि सैरभैर दिसत होते. त्यांना काय म्हणायचं होतं हेच कळेना. त्यांनी मोदींवर टीका केली, नोटाबंदी, बेरोजगारीवर बोलले, त्यांचं काम आतापर्यंत नीट नव्हतं म्हणून टीका केली. मधूनच उद्धव ठाकरेंवरही टोला मारायचे. पण प्रत्येकवेळी जस्टिफिकेशन देत होते. आधी मी भाजपाचे समर्थन करत नव्हतो. आणि आता करणार आहे, याचं ते जस्टिफिकेशन करत आहेत.
“ऐरवी जसे राज ठाकरे बोलतात, तसं कालचं भाषण नव्हतं. त्यांची खुमासदार शैलीही नव्हती. ते बहुतेक त्यांच्या मनातसुद्धा कन्फ्युज होते. त्यामुळे त्यांच्या भाषणानंतर मी ट्वीटही केलं की केहना क्या चाहते हो. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मनसैनिक आले होते. पहिल्यांदाच त्यांनी छोटंसं भाषण केलं. तेही डिस्टर्ब झाले असतील. भाजपाला पाठिंबा जाहीर करण्याच्या आधी ते म्हणाले की व्यभिचाराला राजमान्यता देऊ नका. आणि स्वतःच त्यांनी बिनशर्त पाठिंबा दिला. ईडीचं चक्र होतं म्हणूनच बिनशर्त पाठिंबा दिला का? इतकं काय लोककल्याण करणारे राजकारणी उरलेले नाहीत”, असा टोलाही त्यांनी लगावला.