इस्लामिक देशात हिंदु मंदिराची उभारणी होणे, ही वैश्विक हिंदु राष्ट्र निर्मितीची नांदी ! – श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ, सनातन संस्था

0
320

अबू धाबी, दि. १९ (पीसीबी) – भारतात नुकतेच अयोद्धेत श्रीराम मंदिराची निर्मिती झाली आणि रामललाच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठापना भव्य सोहळा अखिल विश्वाने अनुभवला. आता यु.ए.ई. सारख्या इस्लामिक देशातही भव्य अशा बी.ए.पी.एस्. मंदिराची उभारणी झाली आहे. ही एकप्रकारे वैश्विक हिंदु राष्ट्राच्या निर्मितीची नांदी आहेत, असे प्रतिपादन श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी केले. अबू धाबी येथील मंदिर उद्घाटन कार्यक्रमानंतर त्या बोलत होत्या.

या वेळी श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ या म्हणाल्या की, मागील काही शतकांमध्ये भारतातील हिंदु मंदिरांवर आक्रमणे झाली, मंदिरे नष्ट-भष्ट करण्यात आली; आता भारतातील अशा वास्तू पुन्हा कायदेशीर मार्गांनी लढा देऊन हिंदु समाजाला मिळू लागल्या आहेत. त्या ठिकाणी मंदिरे उभी रहात आहेत. इतकेच काय, आता इस्लामी देशांत हिंदु मंदिरांची उभारणी होऊ लागली आहे. हिंदु धर्माची महानता ही काळानुसार विश्वभरात पसरत चालली आहे. हे कालचक्र आहे, ते कोणी रोखू शकत नाही. भारत हा विश्वगुरुपदाकडे वाटचाल करत असल्याचेच हे द्योतक आहे.

पश्चिम आशियातील सर्वांत मोठे हिंदु मंदिर असलेल्या ‘बी.ए.पी.एस्. हिंदु मंदिरा’चे उद्घाटन १४ फेब्रुवारी या दिवशी भारताचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. यानिमित्ताने मंदिराच्या वतीने १५ फेब्रुवारी या दिवशी आयोजित ‘हार्मनी’ या कार्यक्रमाला सनातन संस्थेच्या वतीने सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांची वंदनीय उपस्थिती लाभली. मंदिराचे पदाधिकारी श्री. रवींद्र कदम यांनी ऑक्टोबर २०२३ मध्ये मंदिराच्या वतीने उद्घाटन समारंभाचे निमंत्रण पाठवले होते. मंदिराचे प्रमुख महंत स्वामी महाराज यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला हरिद्वार येथील आखाड्याचे महामंडलेश्वर स्वामी अवधेशानंद ‘प्रमुख पाहुणे’ म्हणून उपस्थित होते. स्वामी ब्रह्मविहारीदास महाराज यांनी स्वागतपर भाषण केले.

सनातन संस्थेच्या ३ गुरूंच्या नावे मंदिराच्या बांधकामासाठी ३ विटा अर्पण !

जुलै २०२२ मध्ये श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ या संशोधनाच्या निमित्ताने संयुक्त अरब अमिरातच्या दौर्‍यावर होत्या. त्या वेळी त्यांनी ‘बी.ए.पी.एस्. हिंदु मंदिरा’ला भेट देऊन बांधकामाची पहाणी केली होती आणि सनातन संस्थेच्या ३ गुरूंच्या नावाने (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या नावे) मंदिराच्या बांधकामासाठी ३ विटा पूजन करून अर्पण केल्या होत्या.