दि.०२(पीसीबी)-इराण-इस्रायल-अमेरिका संघर्षाने अत्यंत गंभीर वळण घेतले आहे. इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सने थेट इस्रायलच्या पंतप्रधानांच्या कार्यालयावर हल्ला केल्याचा दावा केल्याने जागतिक राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या हल्ल्यानंतर इस्रायलचे पंतप्रधान बेन्यामिन नेतन्याहू (Benjamin Netanyahu) यांची सद्यस्थिती काय आहे, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नसल्याने तणाव अधिक वाढला आहे.
IRGC चा दावा, इस्रायली सत्ताकेंद्रावर थेट लक्ष्य :
इराण (Iran) च्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सने अधिकृत निवेदनात दावा केला आहे की त्यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेन्यामिन नेतन्याहू यांच्या कार्यालयावर तसेच इस्रायली वायुसेनेच्या कमांडर उपस्थित असलेल्या ठिकाणावर अचूक हल्ला केला. हा हल्ला अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात आला असून IRGC च्या जनसंपर्क विभागाने याची माहिती दिली आहे.
हल्ल्यानंतर नेतन्याहू यांची नेमकी स्थिती काय आहे, याबाबत कोणतेही स्पष्ट माहिती उपलब्ध नाही. मात्र या कारवाईनंतर नेतन्याहू यांच्याविषयी ठोस माहिती मिळालेली नसून पुढील तपशील लवकरच जाहीर केला जाईल. इस्रायल कडूनही या दाव्यांवर तत्काळ अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. त्यामुळे अफवांना उधाण आले असून आंतरराष्ट्रीय समुदायाचे लक्ष या घटनेकडे वेधले गेले आहे.
या पार्श्वभूमीवर इस्रायली सैन्याने इराणमधील पहिल्या टप्प्यातील हल्ल्यांमध्ये दोन वरिष्ठ इराणी गुप्तचर अधिकाऱ्यांचा मृत्यू झाल्याचा दावा केला आहे. इस्रायली लष्कराच्या निवेदनानुसार सईद यह्या हमीदी आणि जलाल पूर हुसेन हे या कारवाईत ठार झाले आहेत. हमीदी हे इराणच्या गुप्तचर मंत्रालयात इस्रायलविषयक प्रकरणांचे उपमंत्री होते, तर हुसेन हे गुप्तहेर विभागाचे प्रमुख असल्याचा दावा इस्रायलने केला आहे.
इस्रायली निवेदनात असेही नमूद करण्यात आले आहे की, या दोघांसह इतर काही वरिष्ठ दहशतवादी घटकांनाही लक्ष्य करून ठार करण्यात आले. या आरोपांमुळे संघर्ष अधिक तीव्र झाला असून दोन्ही बाजूंनी परस्पर दावे आणि प्रत्युत्तर सुरू आहेत. याचदरम्यान, इराणने अमेरिका (United States) आणि इस्रायलवर गंभीर आरोप करत त्यांच्या हल्ल्यांना बेकायदेशीर आणि गुन्हेगारी स्वरूपाचे ठरवले आहे.
आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेत (IAEA) इराणचे राजदूत रेजा नजाफी यांनी दावा केला की अमेरिका आणि इस्रायलने इराणच्या अणुऊर्जा केंद्रावर हल्ला केला. त्यांच्या म्हणण्यानुसार नतान्झ न्यूक्लिअर फॅसिलिटी या अणुऊर्जा प्रकल्पाला लक्ष्य करण्यात आले. हा नऊ महिन्यांच्या आत झालेला दुसरा हल्ला असल्याचा आरोप त्यांनी केला.
नजाफी यांनी हे हल्ले बेकायदेशीर, निर्दयी आणि गुन्हेगारी स्वरूपाचे असल्याचे सांगत अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणावर तीव्र टीका केली. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर व्हिएन्ना (Vienna) येथे IAEA च्या बोर्ड ऑफ गव्हर्नर्सची आपत्कालीन बैठक बोलावण्यात आली आहे. ही बैठक रशिया (Russia) च्या विनंतीवरून आयोजित करण्यात आल्याची माहिती आहे.
IAEA चे महासंचालक राफाएल मारीयानो ग्रॉसी यांनी इशारा दिला आहे की सध्या इराणच्या शेजारील देशांमध्ये किरणोत्सर्गाची पातळी सामान्य मर्यादेत आहे, मात्र परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे. संभाव्य रेडिओलॉजिकल गळतीमुळे मोठ्या प्रमाणावर स्थलांतर करावे लागू शकते, असा इशाराही त्यांनी दिला. त्यांनी सर्व पक्षांना संयम राखण्याचे आणि पुन्हा कूटनीतीच्या मार्गावर परतण्याचे आवाहन केले आहे.









































