इस्रायल आणि हमास यांच्यात सुरु असलेल्या युद्धात आतापर्यंत ३१ पत्रकारांचा मृत्यू

0
382

विदेश, दि. १ (पीसीबी) – इस्रायल आणि हमास यांच्यात सुरु असलेल्या युद्धात आतापर्यंत 9,000 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. या युद्धात मोठ्या संख्येने पत्रकारही मारले गेले आहेत. अहवालानुसार, 7 ऑक्टोबरपासून सुरु झालेल्या या युद्धात आतापर्यंत 31 पत्रकारांचा मृत्यू झाला आहे. कमिटी टू प्रोटेक्ट जर्नालिस्ट (CPJ) ने ही आकडेवारी जाहीर केली आहे. मारल्या गेलेल्या पत्रकारांमध्ये 26 पत्रकार पॅलेस्टाईन, 4 पत्रकार इस्रायल आणि एक पत्रकार लेबनॉनचा आहे. याशिवाय, या युद्धात 8 पत्रकार जखमी झाले आहेत. वृत्तानुसार, 9 पत्रकार बेपत्ता किंवा ताब्यात घेण्यात आले आहेत.

वृत्तानुसार, या युद्धात पत्रकारांवर सातत्याने हल्ले होत आहेत. तसेच पत्रकारांना अटक करुन धमकावले जात आहे. मारल्या गेलेल्या 31 पत्रकारांपैकी 26 गाझामध्ये मरण पावले. यापैकी 4 इस्रायलवर हमासने केलेल्या हल्ल्यात ठार झाले. विशेष म्हणजे, 7 ऑक्टोबर रोजी हमासने गाझा पट्टीतून 5 हजारांहून अधिक रॉकेट इस्रायलवर डागली. यामध्ये सुमारे 1400 इस्रायली मारले गेले. यानंतर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी युद्धाची घोषणा केली.

गाझामध्ये मानवतावादी संकट

दरम्यान, युद्ध सुरु होऊन 25 दिवस उलटले आहेत. याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणात बसला आहे. गाझामध्ये मानवतावादी संकटाची परिस्थिती निर्माण झाली आहे. इस्रायल हमासच्या ठिकाणांवर सातत्याने हल्ले करत आहे. इस्रायलच्या सततच्या बॉम्बफेकीमुळे गाझामधील घरे, रस्ते आणि रुग्णालयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जीवनावश्यक वस्तूंची समस्या कायम आहे. जखमींना योग्य उपचारही मिळत नाहीत. युद्धादरम्यान, पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचा युद्धबंदीसंबंधी अद्याप कोणताही विचार नाही. जोपर्यंत हमासचा खात्मा होत नाही तोपर्यंत हल्ले सुरुच राहतील, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.