पिंपरी, दि. १७ -‘स्पेस ऑन व्हिल्स’ पश्चिम महाराष्ट्रात दाखल; १९-२२ ऑक्टोबर दरम्यान पिंपरी चिंचवड सायन्स पार्क व रहाटणी मधील एस एन बी पी शाळेमध्ये असणार आहे.
पिंपरी-चिंचवड, दिनांक १७ ऑक्टोबर : भारतीयांचा स्वाभिमान असलेली भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्त्रो) आपल्या भेटीला येणार आहे. पश्चिम महाराष्ट्रातील विद्यार्थी आणि विज्ञानप्रेमी नागरिकांना ‘स्पेस ऑन व्हिल्स’ या उपक्रमांतर्गत इस्त्रोच्या आजवरच्या पराक्रमांची रोमांचकारी सफर अनुभवता येणार आहे. विज्ञान भारती (VIBHA) आणि इस्रो यांच्या संयुक्त विद्यमाने ‘स्पेस ऑन व्हील्स’ हा विशेष विज्ञान प्रचार उपक्रमाची १७ ऑक्टोबर २०२४ रोजी पुण्यात उत्साहात सुरूवात झाली आहे. १९ व २० ऑक्टोबर, या शनिवार व रविवारी ‘स्पेस ऑन व्हिल्स’ पिंपरी चिंचवड सायन्स पार्क व तारांगण येथे विज्ञान रसिकांसाठी स. १०:०० ते सायं. ०६:०० या वेळेत सज्ज असणार आहे.
त्यानंतर दिनांक २१-२२ तारखांना, रहाटणी मधील एस एन बी पी शाळेमधील तसेच परिसरातील शालेय विद्यार्थ्यांना या प्रदर्शनाचा लाभ होणार आहे.
विज्ञान भारती व पिंपरी चिंचवड सायन्स पार्कच्या वतीने ही माहिती देण्यात आली. पुण्यासह नाशिक, अहिल्यानगर, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापर जिल्ह्यांत हे प्रदर्शन फिरणार आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून अंतराळ विज्ञानाचा प्रचार आणि विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचा उद्देश आहे. विज्ञान भारती पश्चिम महाराष्ट्र प्रांताच्या समन्वयाने हा उपक्रम राबविला जात आहे. पहिल्या टप्प्यात पुणे, पिंपरी चिंचवड शहरांत ‘स्पेस ऑन व्हिल्स’ हा उपक्रम विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणार आहे.
“भारताच्या विकासामध्ये अवकाश विज्ञानाच्या प्रगतीचे मोठे योगदान आहे. आधुनिक भारताच्या जडण-घडणीत भारतीय अवकाश संशोधन संस्थेने गेल्या साडे पाच दशकांत अनेक अडचणीचे टप्पे पार करून अंतरीक्ष युगात जी झेप घेतली आहे त्यामुळे संपूर्ण मानवजातीला विविध क्षेत्रांत लाभ मिळत आहे. या प्रगतीची झलक इस्रोच्या या प्रदर्शनातून दाखविली जाणार आहे. तरी, जास्तीत जास्त विद्यार्थी, शिक्षक व नागरिकांनी याचा लाभ घ्यावा”, असे आवाहन संचालक मंडळ, पिंपरी चिंचवड सायन्स पार्कच्या वतीने करण्यात आले आहे.
“या उपक्रमाव्दारे शालेय विद्यार्थ्यांना थेट इस्रो द्वारे अवकाश तंत्रज्ञान ओळख होणार असल्यामुळे, एक जागरूक शिक्षण संस्था म्हणून या उपक्रमात सहभागी होताना आम्हाला आनंद होतो आहे”, असे मत, एस एन बी पी शाळेच्या संचालक व मुख्याध्यापिका सौ जयश्री वेंकटरमण यांनी व्यक्त केले.
उपक्रमात नक्की काय –
‘स्पेस ऑन व्हील्स’ कार्यक्रमासोबतच, विद्यार्थ्यांसाठी विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. याशिवाय, विद्यार्थ्यांच्या ज्ञानाची आणि कल्पकतेची परीक्षा घेण्यासाठी प्रश्नमंजुषा आयोजित केल्या जातील. ह्याचे आयोजन संबंधित यजमान संस्थेच्या सहकार्याने होईल.
कार्यक्रमाची वैशिष्ट्ये:
- अंतराळ संशोधनाची ओळख: इस्रोच्या यशस्वी मोहिमांचे प्रतिकृती मॉडेल्स आणि संबंधित माहिती.
- शैक्षणिक उपक्रम: विद्यार्थ्यांना व्यावहारिक अनुभव देणारे क्रियाकलाप आणि स्पर्धा.
- सर्वांसाठी खुला प्रवेश: हा उपक्रम विद्यार्थ्यांसह शिक्षक, विज्ञान प्रेमी आणि नागरिकांसाठी खुला आहे.
- कार्यक्रमात सहभागी शाळा आणि संस्थांना प्रशस्तीपत्रे प्रदान केली जातील.
- प्रदर्शनाच्या आयोजनात सहाय्य करणाऱ्या स्वयंसेवकांना विज्ञान भारती व इस्रोकडून प्रमाणपत्रे दिली जातील