इर्शाळवाडी दुर्घटना – आत्तापर्यंत ७ जणांचा मृत्यू, १७८ अडकलेले

0
657

रायगड,दि.२०(पीसीबी) – रायगड जिल्ह्यातील खालापूरजवळील इर्शाळवाडी गावावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. बुधवारी रात्री साडेदहा ते अकरा वाजण्याच्या सुमारास इर्शाळगडावर दरड कोसळली आणि पायथ्याशी असलेलं इर्शाळवाडी गाव उद्ध्वस्त झालं. या गावात 45 ते 50 घरांची वस्ती आहे, यातील 30 ते 40 घरातील लोक मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती मिळाली आहे.

मुंबई-पुणे जुना महामार्गावरुन जात असताना कर्जत आणि पनवेलच्या मधोमध इर्शाळगडला जाण्यासाठीचा रस्ता आहे. इर्शाळगड हा रायगडमधील प्रसिद्ध ट्रेकिंग पॉईंट आहे. खालापूरजवळून मोरबे डॅम मार्गे गावाकडे जाण्याचा रस्ता आहे. पावसाळ्यामुळे शनिवार आणि रविवारी ट्रेकर्सची पाऊलं इर्शाळगडाकडे वळतात. वीकेंडला गडावर मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात. मात्र ऐन बुधवारी रात्री दरड कोसळल्याची घटना घडल्याने यात कोणताही पर्यटक किंवा ट्रेकर अडकलेला नाही. मात्र पायथ्याशी असलेलं इर्शाळवाडी गाव उद्ध्वस्त झालं. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, इर्शाळवाडी हे गाव दरडग्रस्त यादीत येत नव्हतं, तरी देखील दुर्दैवाने पावसामुळे या गावावर दरड कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे.

अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकले
इर्शाळवाडी दरड दुर्घटना ही माळीणची पुनरावृत्ती असल्याचं म्हटलं जात आहे. सध्या इर्शाळवाडी गावात NDRF ची टीम घटनास्थळी पोहोचली असून बचावकार्य सुरु आहे. मुसळधार पाऊस आणि धुक्यामुळे घटनास्थळापर्यंत पोहोचणं अत्यंत कठीण झालं आहे. 25 ते 30 जणांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आलं आहे. जवळपास 100 हून अधिक लोक मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकले आहेत, यातील काहींना सुखरुप बाहेर काढण्यात आलं, तर काहींचा मृत्यू झाला आहे. गडावर जात असतानाच एका अग्निशमन दलाच्या जवानाचा दम लागून मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.

मुख्यमंत्र्यांनी घेतला परिस्थितीचा आढावा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे इर्शाळवाडी गावात दाखल झाले आहेत. इर्शाळवाडी हे गाव दरडग्रस्त यादीत येत नव्हतं, असं त्यांनी सुरुवातीलाच स्पष्ट केलं. गावात पोहोचणं कठीण झाल्याने बचावकार्य संथ गतीने सुरु आहे, शेतीकामात वापरल्या जाणाऱ्या अवजारांनीच ढिगारा पसरवला जातोय. अत्यंत विखुरलेल्या स्थितीमुळे गडावर चढणं देखील अवघड झालं आहे. दोन हेलिकॉप्टरच्या सहाय्याने मदतकार्य करण्यात येईल, असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. परंतु पावसाच्या स्थितीमुळे आणि दाट धुक्यांमुळे हेलिकॉप्टर चालवण्यास अडथळा येत आहे. वायु दलाशी बोलून लवकरच मार्ग काढला जाईल, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं.

मृताच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत
इर्शाळवाडीवर दरड कोसळून अनेकजण जखमी झाले आहेत, तर काही जणांचा मृत्यू झाला आहे. दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाखांची मदत करण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. तर जखमींचा पूर्ण खर्च राज्य सरकार करणार असल्याचं देखील मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. इर्शाळवाडी दरड दुर्घटनेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दु:ख व्यक्त केलं आहे.