इराण-इस्त्रायल युद्धाचे भारतावर परिणाम; गॅस तुटवडा, उद्योग बंद, नागरिक हैराण

0
3

दि.१२(पीसीबी)-इराण आणि इस्त्रायल यांच्यात सुरू असलेल्या युद्धाच्या झळा आता भारतातही जाणवू लागल्या आहेत. वाढलेले कच्च्या तेलाचे दर, एलपीजी सिलेंडरचा तुटवडा आणि उद्योगांवर आलेले संकट यामुळे सर्वसामान्य नागरिकांसह व्यावसायिकही मोठ्या अडचणीत सापडले आहेत.सध्या अनेक शहरांमध्ये एलपीजी सिलेंडरची कमतरता जाणवत असून हॉटेल्स आणि रेस्टॉरंट व्यवसायावर त्याचा मोठा परिणाम झाला आहे. अनेक हॉटेल्स बंद ठेवावी लागत आहेत, तर काही ठिकाणी सेवा मर्यादित करण्यात आली आहे. दुसरीकडे घरगुती गॅस मिळत नसल्यामुळे नागरिकांना गॅस एजन्सीबाहेर भर उन्हात लांबच लांब रांगा लावाव्या लागत आहेत.

आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे भारतात येणाऱ्या क्रूड ऑइलच्या पुरवठ्यावरही परिणाम झाला आहे. कच्च्या तेलाचे दर गगनाला भिडल्याने त्याचा थेट फटका विविध उद्योगांना बसत आहे.याचाच परिणाम बीड जिल्ह्यातील ठिबक सिंचन पाईप तयार करणाऱ्या उद्योगांवरही झाला आहे. क्रूड ऑइलचा पुरवठा कमी झाल्याने आणि त्याच्या किंमती दुप्पट-तिप्पट वाढल्याने या कंपन्यांना उत्पादन थांबवण्याची वेळ आली आहे. त्यामुळे अनेक कामगारांवर बेरोजगारीचे संकट ओढवण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

या परिस्थितीबाबत उद्योजक संतोष उपरे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, जोपर्यंत हे युद्ध थांबत नाही तोपर्यंत परिस्थिती सुरळीत होणे कठीण आहे. युद्धामुळे उद्योग, व्यवसाय आणि सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

दरम्यान, युद्धाचे परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवर दिसू लागले असून त्याचा थेट फटका भारतातील उद्योग आणि सामान्य नागरिकांना बसत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.