इराण-अमेरिका संघर्ष तीव्र ! कुवेतमध्ये अमेरिकन तळांवर हल्ला? F-15 पाडल्याचा दावा

0
2

दि.०२ (पीसीबी) – मध्यपूर्वेत तणाव शिगेला पोहोचला असून अमेरिका-इस्रायलच्या कारवायांना इराणकडून जोरदार प्रत्युत्तर दिलं जात असल्याचा दावा केला जात आहे. इराणने काल दुबईवर हल्ला केल्यानंतर आज कुवेतमधील अमेरिकन लष्करी तळांवर हल्ला केल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठी खळबळ उडाली आहे.

कुवेती संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्याच्या कथित माहितीनुसार, सोमवारी सकाळी झालेल्या हल्ल्यात अमेरिकेची अनेक लष्करी विमाने नष्ट झाली. मात्र या विमानांतील पायलट आणि क्रू मेंबर्सनी वेळेत इजेक्ट केल्यामुळे ते सुरक्षित असल्याचं सांगितलं जात आहे. त्यांना तातडीने वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आलं असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचंही समोर आलं आहे.

स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, एका अमेरिकन F-15 लढाऊ विमानाला ड्रोनने पाडल्याचा दावा केला जात आहे आणि याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तथापि, या व्हिडिओची स्वतंत्र पुष्टी अद्याप अधिकृत पातळीवर झालेली नाही. विशेष म्हणजे या घटनेबाबत अमेरिकेच्या सेंट्रल कमांडकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही, त्यामुळे या दाव्यांची सत्यता अद्याप स्पष्ट झालेली नाही.

दरम्यान, इराणी रेड क्रेसेंट सोसायटीने दिलेल्या माहितीनुसार, अमेरिका-इस्रायलच्या हवाई हल्ल्यांमध्ये इराणमध्ये आतापर्यंत किमान ५५५ जणांचा मृत्यू झाला असून १३१ शहरांचे नुकसान झाले आहे. बाधित भागात बचावकार्य सुरू असून लाखो स्वयंसेवक मदतीसाठी सज्ज असल्याचंही सांगितलं जात आहे.

या घटनांनंतर अमेरिकन सैन्य आणि स्थानिक प्रशासनामध्ये समन्वय सुरू असून संयुक्त तांत्रिक तपासणी केली जात आहे. हल्ल्याचं नेमकं कारण आणि नुकसानाची खरी व्याप्ती जाणून घेण्यासाठी चौकशी सुरू आहे.

एकीकडे मध्यपूर्वेतील तणाव वेगाने वाढत असताना, दुसरीकडे या दाव्यांवर अधिकृत पुष्टी नसल्यामुळे परिस्थितीबाबत अनिश्चितता कायम आहे. पुढील काही तासांत अमेरिका किंवा कुवेतकडून अधिकृत निवेदन येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.