दि.०३(पीसीबी)- इराण आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या तणावाने आता गंभीर वळण घेतले असून, जागतिक सुरक्षेबाबत मोठी चिंता निर्माण झाली आहे. युद्ध थांबवण्यासाठी चर्चा सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवरच दोन्ही देशांकडून हल्ले सुरू असल्याचे चित्र समोर येत आहे.अशातच, इराणने बहरीनमधील ॲमेझॉनशी संबंधित केंद्रावर क्षेपणास्त्र हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. हमाला परिसरातील बटेल्को कंपनीच्या इमारतीला या हल्ल्यात मोठे नुकसान झाले आहे. बटेल्को ही बहरीनमधील प्रमुख दूरसंचार कंपनी असून, ॲमेझॉन वेब सर्व्हिसेससाठी काम करते.
या हल्ल्यामुळे युद्ध केवळ लष्करी ठिकाणांपुरते मर्यादित न राहता आता आयटी आणि डिजिटल पायाभूत सुविधांपर्यंत पोहोचल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे जागतिक तंत्रज्ञान क्षेत्र आणि आर्थिक व्यवस्थेवर याचे दूरगामी परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, इराणच्या लष्कराने यापूर्वीच अमेरिकेतील १८ मोठ्या कंपन्यांना इशारा दिला होता. या कंपन्या इराणविरोधात अमेरिकेला मदत करत असल्याचा आरोप करत, त्यांच्या कार्यालयांवर हल्ले करण्याची धमकी देण्यात आली होती.
या यादीमध्ये डेल, मायक्रोसॉफ्ट, गूगल, ॲपल, इंटेल, IBM, टेस्ला, बोइंग, HP, सिस्को, ओरेकल, मेटा, जेपी मॉर्गन, जनरल इलेक्ट्रिक, G42, एनव्हिडिया आणि प्लॅन्टर यांसारख्या जागतिक कंपन्यांचा समावेश आहे.
इराणच्या लष्कराने दिलेल्या निवेदनात स्पष्ट इशारा देत म्हटले होते की, “इराणमध्ये होणाऱ्या कोणत्याही हल्ल्याच्या प्रत्युत्तरात संबंधित कंपन्या आणि त्यांच्या युनिट्सना लक्ष्य केले जाईल.” तसेच, या कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कार्यालयांपासून दूर राहण्याचा सल्लाही देण्यात आला होता.
दरम्यान, या घटनेनंतर अमेरिका आणि सहयोगी देश सतर्क झाले असून, परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. तज्ज्ञांच्या मते, हा संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता असून, जागतिक स्तरावर तणाव वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.








































