दि.०८(पीसीबी)-जागतिक स्तरावर इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव तात्पुरता निवळला असताना, भारतात रिझर्व्ह बँकेने महत्त्वाचा आर्थिक निर्णय जाहीर केला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन आठवड्यांच्या शस्त्रसंधीची घोषणा केल्यानंतर, भारतीय अर्थव्यवस्थेकडे लक्ष लागले होते.
दरम्यान, आज 8 एप्रिल रोजी झालेल्या मौद्रिक धोरण समितीच्या (MPC) बैठकीत रिझर्व्ह बँकेने रेपो दरात कोणताही बदल न करता तो 5.25% वर स्थिर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी ही माहिती दिली.
पश्चिम आशियातील वाढता तणाव, कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये झालेली मोठी वाढ आणि रुपयातील घसरण या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे बाजारात स्थिरता राखण्याचा प्रयत्न आरबीआयकडून करण्यात आला असल्याचे मानले जात आहे.
आरबीआयने फेब्रुवारी 2025 पासून आतापर्यंत एकूण 125 बेसिस पॉइंट्सने दरकपात केली असून, 2019 नंतर इतक्या वेगाने दर कमी करण्याची ही पहिलीच वेळ ठरली आहे. मात्र, मागील काही बैठकींप्रमाणे यावेळी दर स्थिर ठेवत अर्थव्यवस्थेला काहीसा दिलासा देण्यात आला आहे.
याशिवाय, आरबीआयने आर्थिक वर्ष 2027 साठी जीडीपी वाढीचा अंदाज वाढवला असून, पहिल्या तिमाहीसाठी 6.9% आणि दुसऱ्या तिमाहीसाठी 7% वाढ अपेक्षित असल्याचे सांगितले आहे. महागाई दरही 4% ते 4.2% दरम्यान राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
रेपो दर म्हणजे बँकांना आरबीआयकडून मिळणाऱ्या कर्जावरील व्याजदर. याच दरावर बँका ग्राहकांसाठी कर्जाचे व्याजदर ठरवतात. त्यामुळे रेपो दर स्थिर राहिल्याने सध्या EMIमध्ये कोणताही मोठा बदल होणार नसल्याचे संकेत मिळत आहेत.एकंदरीत, जागतिक अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर आरबीआयने सावध भूमिका घेत अर्थव्यवस्थेला स्थिर ठेवण्याचा प्रयत्न केल्याचे स्पष्ट झाले आहे.







































