दि.०८ (पीसीबी) – आखाती प्रदेशात सुरू असलेल्या इराण आणि अमेरिका यांच्यातील तणावाचा परिणाम आता भारतातील स्वयंपाकघरांवरही दिसू लागला आहे. वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरच्या पुरवठा आणि बुकिंग प्रक्रियेत काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत.
नव्या नियमांनुसार घरगुती गॅस सिलिंडर बुक करण्यासाठीचा कालावधी वाढवण्यात आला आहे. यापूर्वी दुसरा सिलिंडर बुक करण्यासाठी १५ दिवसांची प्रतीक्षा करावी लागत होती. मात्र आता हा कालावधी २५ दिवसांपर्यंत वाढवण्यात आला आहे. त्यामुळे एका महिन्यात केवळ एकच सिलिंडर पुरवला जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
केंद्र सरकारने गॅस वितरण करणाऱ्या कंपन्यांना यासंदर्भात सूचना दिल्या असून घरगुती आणि व्यावसायिक दोन्ही प्रकारच्या सिलिंडरच्या वितरणावर काही प्रमाणात मर्यादा ठेवण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील गॅस वितरकांना याबाबत लेखी सूचना देण्यात आल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी महेश सुधाळकर यांनी दिली.
दरम्यान, तेल कंपन्यांनी १४.२ किलोच्या घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरात ६० रुपयांची वाढ केली आहे. मागील ११ महिन्यांतील ही दुसरी दरवाढ असून तिचा परिणाम उज्ज्वला योजनेअंतर्गत मोफत गॅस कनेक्शन मिळालेल्या दहा कोटींहून अधिक कुटुंबांवर होणार आहे.
याशिवाय १९ किलो व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरातही ११४.५ रुपयांची वाढ झाली असून त्याची किंमत आता १८८३ रुपयांवर पोहोचली आहे. युद्धजन्य परिस्थितीमुळे गॅस पुरवठ्यावर परिणाम होत असल्याने काही ठिकाणी तुटवड्याची परिस्थिती निर्माण होत आहे.या दरवाढीचा सर्वाधिक फटका हॉटेल आणि रेस्टॉरंट उद्योगाला बसत असल्याचेही समोर आले आहे










































