इराणचा युरोपला थेट इशारा !

0
1

थेट हिंद महासागरातील अमेरिका-ब्रिटनच्या संयुक्त लष्करी बेस डिएगो गार्सियावर दोन बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली

दि.२१(पीसीबी)- इराणने आज हिंद महासागरातील अमेरिका-ब्रिटन संयुक्त लष्करी तळ असलेल्या डिएगो गार्सिया बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली. सीएनएनच्या वृत्तानुसार, अमेरिकन अधिकाऱ्यांनी याला दुजोरा दिला. इराणने दोन क्षेपणास्त्रे डागली, परंतु त्यापैकी एकही तळावर आदळले नाही. हा तळ इराणच्या किनारपट्टीपासून सुमारे 3810 किलोमीटर आणि तेहरानपासून 5 हजार किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावर आहे. डिएगो गार्सिया हा अमेरिकेसाठी एक महत्त्वाचा लष्करी तळ आहे. या तळावरून अमेरिका आपली बॉम्बर विमाने चालवते. येथून मोठी टँकर विमाने (KC-135) आणि टेळहणी विमाने देखील कार्यरत राहू शकतात.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण युद्धाला पाठिंबा न दिल्याबद्दल नाटो मित्र राष्ट्रांवर नाराजी व्यक्त केली. ट्रम्प म्हणाले की, नाटो देश भित्रे आहेत आणि अमेरिकेशिवाय ही युती केवळ एक कागदी वाघ आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीचा संदर्भ देत ट्रम्प म्हणाले की, ती खुली ठेवण्यासाठी लष्करी मदत देणे सोपे आहे, परंतु मित्र राष्ट्रे त्यापासून मागे हटत आहेत. ते म्हणाले, “ही एक अतिशय सोपी लष्करी चाल आहे, ज्यात धोका खूप कमी आहे, पण त्यांना मदत करायची नाही. ते भित्रे आहेत आणि आम्ही हे लक्षात ठेवू.”

इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी म्हटले आहे की, अमेरिका आणि इस्रायलसोबत सुरू असलेले युद्ध संपवण्यासाठी केवळ युद्धविराम पुरेसा नाही; ते पूर्णपणे संपले पाहिजे. जपानच्या क्योडो न्यूज एजन्सीला दिलेल्या मुलाखतीत अराघची म्हणाले, हे युद्ध आमचे नाही, ते आमच्यावर लादले गेले आहे. आम्ही अमेरिकेशी वाटाघाटी करत असताना आमच्यावर हल्ला झाला, जो पूर्णपणे बेकायदेशीर आणि विनाकारण होता. त्यांनी सांगितले की इराण जे काही करत आहे ते आत्मसंरक्षणासाठी आहे आणि आवश्यक असल्यास आणि जोपर्यंत आवश्यक असेल तोपर्यंत स्वतःचे संरक्षण करत राहील. अराघची यांनी स्पष्टपणे सांगितले की इराण युद्धविराम स्वीकारणार नाही कारण त्याला गेल्या वर्षीच्या परिस्थितीची पुनरावृत्ती नको आहे. त्यांनी यावर जोर दिला की या युद्धाच्या संपूर्ण आणि कायमस्वरूपी समाप्तीची हमी आवश्यक आहे जेणेकरून भविष्यात अशी परिस्थिती पुन्हा निर्माण होणार नाही.

दुसरीकडे, इराणशी संबंधित एका हॅकर गटाने इस्रायली लष्कराचे वरिष्ठ अधिकारी एरन ओर्टल यांचा ईमेल हॅक केल्याचा दावा केला आहे. प्रेस टीव्हीनुसार, ‘हंदला’ नावाच्या हॅकर गटाने सुमारे 1 लाख गोपनीय ईमेल मिळवल्याचा दावा केला आहे, ज्यात इस्रायली लष्करी योजनांशी संबंधित माहिती आहे. ब्रिगेडियर जनरल एरन ओर्टल यांनी पूर्वी इस्रायली सैन्यात उच्च पदावर काम केले होते आणि आता ते एका विद्यापीठात कार्यरत आहेत. सध्या, या हॅकिंगच्या दाव्याला कोणतीही ठोस पुष्टी मिळालेली नाही.